एसटीचीही सीमा भागात तिकीट दरवाढ
कोल्हापूर-बेळगांव 135 वरून 150 रूपये तिकीट
प्रवाशांच्या खिशाला कात्री
कोल्हापूर
कर्नाटक राज्य मार्ग परिवाहन महामंडळाने बस तिकीटामध्ये 15 टक्के वाढ केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या एसटी महामंडळानेही सीमा भागातील बस सेवेंच्या तिकीटामध्ये वाढ केली आहे. सुमारे 10 ते 15 टक्के दरवाढ आहे. याची अंमलबजावणी रविवारी (दि.4) पहाटे पासून झाली आहे.
कर्नाटक सरकारने बस तिकीट दरात 15 टक्के वाढ करून नवीन वर्षामध्ये तेथील प्रवासांना धक्का दिला. कर्नाटक राज्य मार्ग परिवाहन महामंडळाने 4 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून दरवाढीची अंमलबजावणी सुरू केली आहे. याच प्रमाणे महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळानेही कनार्टक हद्दीत जाणारा बसच्या तिकीटामध्ये दरवाढ केली आहे. एसटी महामंडळानेही याची अंमलजावणीही रविवार पहाटेपासून सुरू केली आहे. यामुळे कोल्हापूरातून सीमा भागासह कर्नाटकाच्या हद्दीत जाणाऱ्या निपाणी, बेळगांव, संकेश्वर, गडहिंग्लज, आजरा, बेळगांव यांच्या 9 बस मार्गावरील तिकीट दरात वाढ झाली आहे. यामध्ये कोल्हापूर-बेळगांव एसटीचे तिकीट 135 वरून आता दीडशे रूपये झाले आहे. नव वर्षात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागली आहे.
एसटीचे सीमाभागात वाढलेले तिकीट दर
बस मार्ग जुने दर सध्याचा दर
कोल्हापूर-निपाणी 65 70
कोल्हापूर-बेळगांव 135 150
कोल्हापूर-संकेश्वर 85 90
कोल्हापूर-गडहिंग्लज 95 100
कोल्हापूर-आजरा 125 135
चंदगड-बेळगाव 65 70
आजरा-बेळगाव 85 90
कागल-निपाणी 25 30
रंकाळा-निपाणी 55 60
मॅन्युअल ट्रे मधून फरकाचे तिकीट देणार
भाडेवाडीची माहिती सर्व वाहकांना, वाहतुक पर्यावेक्षकीय कर्मचारी तसेच प्रशासकीय कर्मचारी (तिकीट व रोकड शाख) यांना सूचना कराव्यात. ईटीआयएम मशिनमध्ये सुधारित भाडेवाढीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मॅन्युअल ट्रे मधून फरकाचे तिकीट देण्याबाबत वाहकांना सूचना कराव्यात, असे आदेश कोल्हापूर विभागाचे विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांनी कोल्हापुरातील 12 आगारातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक, स्थानक प्रमुख यांना दिले आहेत.
पुरूषांना दरवाढीचा फटका
महाराष्ट्र आणि कर्नाटक परिवहन मंडळांनी महिला प्रवाशांना तिकीटात सवलत आहे. त्यामुळे दरवाढीचा फटका महिला प्रवाशांच्या तुलनेत प्रवाशांना सर्वाधिक बसणार आहे.
महाराष्ट्रातही होणार एसटीची तिकीट दरवाढ
एसटी महामंडळानेही महाराष्ट्र राज्यशासनाकडे 14 टक्के दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. तीन वर्ष दर वाढ केलेली नाही. डिझेसह अन्य खर्चात वाढ झाल्याने ही वाढ करण्यात येत असल्याचा दावा एसटी महांमडळाने केला आहे.