येत्या 15 ऑगस्टपर्यंत एसटी दर्जा न मिळाल्यास वेगळा मार्ग पत्करणार
त. भा. प्रतिनिधी
केपे : येत्या 15 ऑगस्टपर्यंत धनगर बांधवाना एसटी दर्जा देण्याचा निर्णय न झाल्यास वेगळा मार्ग पत्करण्याचा विचार करणार असल्याचा इशारा धनगर समाजाने दिला आहे.
एसटी दर्जा मिळण्याच्या संदर्भात प्रदीर्घ लढा दिलेल्या धनगर समाजाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. एसटी दर्जा मिळण्यासाठी आवश्यक ते सर्व सोपस्कार पूर्ण झाले असून आता अंतिम निर्णय घेण्यासाठी केवळ राजकीय इच्छाशक्तीची तेवढी आवश्यकता आहे, अशी अखिल गोवा धनगर समाजाची भावना बनली आहे.
धनगर समाजाला एसटी दर्जा देण्याचा विषय गेली 23 वर्षे रखडलेला आहे. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरही एसटी दर्जा देण्याबाबत चालढकल करण्यात येत असल्याची धनगर समाजाची भावना बनली असून त्यामुळे समाजात अस्वस्थता पसरली आहे. धनगर समाजाची या विषयावर रविवारी फोंडा येथे व मंगळवारी कुळे येथे महत्वाची बैठक झाली. या बैठकीत धनगर समाज बांधवातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आवश्यक ते सर्व सोपस्कार पूर्ण झालेले असताना सरकारने केवळ राजकीय इच्छाशक्ती दाखवली तरच समाजाला एसटी दर्जा मिळू शकतो अशी भावना या बैठकीत धनगर समाजबांधवांनी व्यक्त केली. एसटी दर्जाच्या मागणीसाठी सुऊ असलेला लढ्याला निर्णायक स्वरूप देण्याचा निर्णय या बैठकांत झाला. त्यासाठी गाव तसेच तालुका पातळीवर बैठका घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.