For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

'एसटी' आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार; भारताचे सॉलिसिटर जनरलसमवेत दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय

09:34 AM Nov 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
 एसटी  आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार  भारताचे सॉलिसिटर जनरलसमवेत दिल्लीत झालेल्या बैठकीत निर्णय
Advertisement

पणजी: अनुसूचित जमातीला (एसटी समाज) गोव्यात राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय दिल्लीत झालेल्या बैठकीतून घेण्यात आला आहे. राज्य सरकार, एसटी समाज आणि केंद्र सरकारतर्फे स्वतंत्रपणे तीन याचिका (एसएलपी स्पेशल लिव्ह पिटीशन) दाखल करण्याचे ठरवण्यात आले आहे.

Advertisement

भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे गोव्यातून दिल्लीस गेलेल्या शिष्टमंडळाची बैठक झाली. मेहता यांच्याकडे तपशिलवार चर्चा करण्यात आली. एसटीसाठी आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण देण्यासाठी गोवा सरकारने आतापर्यंत केलेल्या एकंदरित कामगिरीचा अहवाल त्यांच्यासमोर मांडण्यात आला. गोवा सरकारतर्फे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून केवळ अंतिम अधिसूचना काढणे तेवढे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची सविस्तर माहिती मेहता यांना देण्यात आली.

राजकीय आरक्षणाची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असताना उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे एकंदरित प्रक्रियेला खीळ बसली असून एसटी समाजाला कायद्यानुसार आरक्षण देण्याच्या मार्गात पेच निर्माण झाला आहे. तो पेच सोडवण्यासाठी आणि हा विषय जिवंत ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मेहता यांनी निदर्शनास आणले आणि तेथे जाण्याची सूचना त्यांनी केली. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जाणार आहेत.

Advertisement

येत्या काही दिवसांत सदर आव्हान याचिका (एसएलपी) सादर करण्यात येणार असून कायदेशीर लढा पुढे चालूच ठेवला जाणार आहे. आव्हान दिले नाही तर हा विषय संपुष्टात येतो आणि तो थांबतो. परिणामी एसटीना राजकीय आरक्षण मिळणे दुरापास्त झाले असते. त्यामुळे आव्हान देणे हा एकच मार्ग उरल्याचे एकंदरित चर्चेतून समोर आले. या बैठकीत अ‍ॅड. देवीदास पांगम (गोवा अ‍ॅडव्होकेट जनरल), सभापती गणेश गांवकर, आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर, एनआरआय आयुक्त अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, अ‍ॅड. प्रवीण फळदेसाई तसेच आदिवासी एसटी समाजाचे प्रमुख नेत्यांनी भाग घेतला आणि राजकीय आरक्षणाचे गान्हाणे मेहतांसमोर मांडले.

Advertisement
Tags :

.