सेंट पॉल्सकडे फिनिक्स चषक
14 वर्षाखालील स्पर्धेत आराध्य नाकाडी उत्कृष्ट खेळाडू, अजान बेपारी उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : फिनिक्स स्पोर्ट्स कौन्सिल आयोजित फिनिक्स चषक 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंट पॉल्स संघाने इस्लामिया संघाचा 3-0 असा पराभव करून फिनिक्स चषक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडू आराध्य नाकाडी. उत्कृष्ट गोलरक्षक अजान बेपारी गौरविण्यात आले. फिनिक्स होनगा आयोजित केलेल्या 14 वर्षाखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंट पॉल्सने केएलएस 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात चौथ्या मिनिटाला आराध्य नाकाडीने मारलेला फटका गोल पोष्टला लागून बाहेर गेला. 11 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या मतीनने मारलेला वेगवान फटका गोलरक्षक विश्वजीत मेत्रीने उत्कृष्ट अडविला. 18 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या मतीनेच्या पासवर आराध्य नाकाडीने गोल करून 1-0 आघाडी पहिल्या सत्रात मिळून दिली. दुसऱ्या सत्रात केएलएसच्या ध्रुव गुरवने गोल करण्याची संधी दवडली. 35 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्य नवीनने मारलेला फटका विश्वजीतने आपला डावीकडे झुकत उत्कृष्ट अडविला.
खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना केएलएसच्या ध्रुव गुरवने गोल करण्याची नामी संधी दवडल्याने केएलएसला पराभवास सामोरे जावे लागले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इस्लामियाने सेंट झेवियरचा सडनडेत मध्ये 4-3 असा पराभव केला. सामन्यात सातव्या मिनिटाला झेवेयरर्सच्या अनिकेत पाटीलच्या पासवर वरून पुजारीने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 35 व्या मिनिटाला इस्लामियाच्या संजल खानच्या पासवर मजूर सय्यदने गोल करून 1-1 अशी बरोबरी केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघाचा गोल फलक समान राहिल्याने पंचानी टायब्र्रेकर नियमाचा वापर केला. टायब्र्रेकर मध्ये दोन्ही संघाचा गोल फलक 2-2 असा बरोबरीत राहिला. इस्लामीयातर्फे संजल खान, व मोहम्मद राहिक मुजावर तर झेवियरर्स तर्फे नील पाटील, सिद्धार्थ तहसीलदार यांनी गोल केले. त्यानंतर पंचानी सडनडेत नियमाचा वापर केला त्यामध्ये इस्लामीयाने 4-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. इस्लामियातर्फे अब्दुलहादी बिस्ती यांनी गोल केला.
अंतिम सामन्याचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे माजी बुडा अध्यक्ष अनिल पोतदार, प्राचार्य विद्या वगण्णवर, फादर चार्ली ब्रॉजीस आदी मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करण्यात आले. अंतिम सामन्यात सेंट पॉल्सने इस्लामियाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात अकराव्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या मतीनच्या पासवर आराध्य नाकाडीने गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 19 व्या मिनिटाला आराध्य नाकाडीच्या पासवर नवीनने दुसरा गोल करून पहिल्या सत्रात 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात इस्लामियाच्या मदर सय्यदने गोल करण्याची नामी संधी दवडली. 29 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या आराध्याच्या पासवर मतीनने गोल करून 3-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात इस्लामीया गोल करण्यात अपयश आले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अनिल पातेदार, विद्या वगण्णवर व इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंट पॉल्स उपविजेत्या इस्लामीया संघाला चषक सर्व खेळाडूंना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आराध्य नाकाडी सेंट पॉल्स, उत्कृष्ट गोलरक्षक अजान बेपारी इस्लामिया यांना चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून रॉयस्टीन जेम्स, विष्णू दावणेकर, पवन देसाई ओमकार शिंदोळकर यांनी काम पाहिले.