सेंटपॉल्स संघाकडे पोलाईट्स चषक
उत्कृष्ट खेळाडू आराध्य नाकाडी सायकलचा मानकरी
बेळगाव : सेंटपॉल्स स्कूल पोलाईट्स वर्ल्डवाईड संघटना व डॉ. गुरु मोदगी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलाईट्स चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंटपॉल्सने सेंट झेवियर्सचा 4-1 असा पराभव करून पहिला पोलाईट्स चषक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडू आराध्य नाकाडी सायकलीचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे बिशप डॉ. डॅरेक फर्नांडिस, सेंटपॉल्सचे प्राचार्य फादर सिमन फर्नांडिस, झेवियर्सचे फादर चार्ली ब्रोजेस, उपप्राचार्य अल्ड्रो डिकोस्टा, दिपीन शहा, डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून खेळाला प्रारंभ करण्यात आला.
47 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या आराध्य नाकाडीच्या पासवर अब्दुल मतीन सय्यदने चौथा गोल करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात सेंटपॉल्सने आपल्या छोट्या पासद्वारे सेंट झेवियर्सवर आक्रमक चढाया केल्या. झेवियर्सने अनेकवेळा सेंटपॉल्सच्या डीमध्ये प्रवेश करुन गोल करण्याचे प्रयत्न केले पण सेंटपॉल्सच्या भक्कम बचावफळीपुढे ते प्रयत्न अपुरे ठरले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंटपॉल्स, उपविजेत्या सेंट झेवियर्स संघाला चषक व प्रमाणपत्र, सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले.