सेंटपॉल्स संघाकडे पोलाईट्स चषक
उत्कृष्ट खेळाडू आराध्य नाकाडी सायकलचा मानकरी
बेळगाव : सेंटपॉल्स स्कूल पोलाईट्स वर्ल्डवाईड संघटना व डॉ. गुरु मोदगी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलाईट्स चषक 14 वर्षांखालील आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंटपॉल्सने सेंट झेवियर्सचा 4-1 असा पराभव करून पहिला पोलाईट्स चषक पटकाविला. उत्कृष्ट खेळाडू आराध्य नाकाडी सायकलीचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात प्रमुख पाहुणे बिशप डॉ. डॅरेक फर्नांडिस, सेंटपॉल्सचे प्राचार्य फादर सिमन फर्नांडिस, झेवियर्सचे फादर चार्ली ब्रोजेस, उपप्राचार्य अल्ड्रो डिकोस्टा, दिपीन शहा, डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते खेळाडूंची ओळख करून खेळाला प्रारंभ करण्यात आला.
या सामन्यात 7 व्या मिनिटाला सेंटपॉल्सचा अब्दुल मतीन सय्यदच्या पासवर आराध्य नाकाडीने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 9 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या किरण डोंगरेच्या पासवर मतीन सय्यदने दुसरा गोल करून 2-0 अशी आघाडी वाढविली. 13 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या नवीन पत्कीच्या पासवर आराध्य नाकाडीने तिसरा गोल करीत पहिल्या सत्रात सेंटपॉल्सला 3-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. 25 व्या मिनिटाला सेंट झेवियर्सच्या मोहम्मद गौसच्या पासवर आर्कान बडेघरने गोल करून 1-3 अशी आघाडी कमी केली. 31 व्या मिनिटाला मोहम्मद गौसने गोल करण्याची सुवर्णसंधी वाया दवडली.
47 व्या मिनिटाला सेंटपॉल्सच्या आराध्य नाकाडीच्या पासवर अब्दुल मतीन सय्यदने चौथा गोल करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात सेंटपॉल्सने आपल्या छोट्या पासद्वारे सेंट झेवियर्सवर आक्रमक चढाया केल्या. झेवियर्सने अनेकवेळा सेंटपॉल्सच्या डीमध्ये प्रवेश करुन गोल करण्याचे प्रयत्न केले पण सेंटपॉल्सच्या भक्कम बचावफळीपुढे ते प्रयत्न अपुरे ठरले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या सेंटपॉल्स, उपविजेत्या सेंट झेवियर्स संघाला चषक व प्रमाणपत्र, सर्व खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट संघ इंडस अल्टाम, उत्कृष्ट प्रशिक्षक श्रवण उचगावकर-सेंटपॉल्स, उत्कृष्ट गोलरक्षक तुषार संबर्गी-जैन हेरिटेज, उत्कृष्ट उगवता खेळाडू हुझेफा मकानदार- कॅन्टोन्मेंट यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आराध्य नाकाडी-सेंटपॉल्स याला गेअरची सायकल, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून अमिन बेपारी, फिरोज शेख, विष्णू दावणेकर, रॉयस्टीन जेम्स यांनी काम पाहिले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पोलाईट्स वर्ल्डवाईड संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.