एसटीची नवी स्लिपर बस ‘सुसाट’! कोल्हापूर विभागाला महिन्याच्या आताच १५ लाखांची कमाई
मुंबई, शिर्डी, बोरीवली बस सेवेला उत्स्फुर्त प्रतिसाद : अडीच हजार प्रवाशांनी केला प्रवास : आरामदायी प्रवासामुळे सिल्पर बसला पसंती
विनोद सावंत कोल्हापूर
राज्य एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागामध्ये नवीन सहा स्लिपर बस दाखल झाल्या आहेत. या स्लिपर बसच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात मुंबई, बोरीवली व शिर्डी मार्गावर ही सेवा असून आरामदायी प्रवासामुळे प्रवाशांकडून यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. महिन्याच्या आताच एसटीच्या तिजोरीत 15 लाख जमा झाले असून अडीच हजार जणांनी यातून प्रवास केला आहे.
एसटी महामंडळाकडून अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. राज्यातील वाहतूक सेवेतील प्रवाशांची वाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे. एसटीमधून रोज 53 लाख लोक प्रवास करतात. एसटीच्या ताफ्यात सध्या शिवशाही, शिवनेरी, शिवाई, अश्वमेध, हिरकणी, विठाई अशा विविध निम आरामदायी बसचा समावेश आहे. परंतु रात्री लांब पल्ल्याचा प्रवास करताना शयनयान (100 टक्के स्लिपर) बस प्रवाशांना सोयीची ठरते. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिकांकडून प्रवास आरामदायी असणाऱ्या स्लिपर बसला प्राधान्य दिले जाते. खासगी ट्रॅव्हल्सच्या स्लिपर बसला नेहमीच गर्दी असते. त्यामुळे प्रवाशांकडून एसटीने देखील स्लिपर बस सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार एसटीने स्लिपर बसची बांधणी केली असून राज्यात टप्प्या-टप्प्याने ही बस सेवा दिली जात आहे.
एसटीच्या कोल्हापूर विभागात नव्याने 6 स्लीपर बसेस दाखल झाल्या आहेत. जिल्ह्यातील बहुतांश प्रवासीवर्ग मुंबई येथे कामासाठी, शिर्डी येथील साईबाबाच्या दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असतो. ही गरज लक्षात घेता कोल्हापूर आगाराने पहिल्या टप्प्यात मुंबई, बेरीवली व शिर्डी या लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी वर्गाचा प्रवास अधिक आरामदायी होण्याच्या दृष्टीने 30 जुलैपासून कोल्हापूर ते मुंबई अशी पहिली 100 टक्के स्लीपर बस सेवा सुरू झाली. रात्री 9.30 वाजता कोल्हापूर ते मुंबई, मुंबई ते कोल्हापूर रात्री 8.30 वाजता अशी सेवा आहे. त्यानंतर कोल्हापूर ते बोरीवली आणि कोल्हापूर ते शिर्डी अशीही स्लिपर बस सेवा सुरू केली. यामध्ये कोल्हापूर-बोरीवली रात्री 8.30 वाजता, बोरीवली-कोल्हापूर रात्री 8 वाजता, कोल्हापूर ते शिर्डी रात्री 8 वाजता तर शिर्डी ते कोल्हापूर रात्री 9 वाजता या वेळेत ही स्लिपर बस धावत आहे. या स्लिपर बसचे एसटीच्या संकेतस्थळावरुन मोबाईल अॅपवरुन आरक्षण करता येते.
एसटीची खासगी ट्रॅव्हलर्सला जोरदार टक्कर
कोल्हापूर-मुंबई स्लिपर बससेवा सुरू करून 20 दिवस झाले असून शिर्डी सेवेला 19 दिवस तर बोरीवली बस सेवेला 15 दिवस झाले आहेत. यास प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याचा आतापर्यंत 2 हजार 413 प्रवाशांनी लाभ घेतला असून एसटीला 15 लाख 46 हजार 630 रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामुळे एसटीचे प्रवासी ट्रॅव्हलर्सकडे जाण्यापासून काही अंशी कमी होत आहे.
एसटीची प्रथमच 100 टक्के स्लीपर बस सेवा
एसटीच्या ताफ्यात यापूर्वी 15 सीटर निमस्लिपर बस होत्या. आता नवीन बसमध्ये 30 सीट असून पूर्ण स्लिपर आहेत. प्रथमच एसटीच्या ताफ्यात अशा सुविधांची बस आली आहे.
बस प्रवासी उत्पन्न
कोल्हापूर-मुंबई 6 लाख 86 हजार 490 1036
कोलहापूर-शिर्डी 4 लाख 28 हजार 572 749
कोल्हापूर-बोरीवली 4 लाख 31 हजार 565 628
एकूण 15 लाख 46 हजार 630 2413
नवीन स्लिपर बसमध्ये सवलत योजनेचाही लाभ
नव्याने सुरू झालेल्या स्लिपर बसला प्रवाशांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाही या बसमधून सवलतीमध्ये प्रवास करता येत आहे. आतापर्यंत या बसमधून 2 हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून 15 लाखांहून अधिकचे उत्पन्न मिळाले आहे.
एम. एस. विभुते, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, एसटी कोल्हापूर