सांगेत मंत्री सुभाष फळदेसाईंच्या विरोधात ‘एसटी’ची मोर्चेबांधणी
समाजाचा एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय: माजी आमदार प्रसाद गांवकरसह सर्वजण एकवटले ..जी 8
त.भा. प्रतिनिधी
सांगे : सांगे मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार तथा मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या विरोधात अनुसूचित जमाती समाजातील एकमेव उमेदवार उभा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. समाजसेवा आणि जनकल्याणाच्या कार्यात सातत्याने सक्रिय असलेल्या अनुसूचित जमाती समाजातील एका सक्षम उमेदवारालाच सर्व नेत्यांचा एकमुखी पाठिंबा दिला जाईल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
रिवण-सांगे येथील दक्षिणादेवी सभागृहात अनुसूचित जमाती (एसटी) समाजातील प्रमुख नेत्यांची काल सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मतदारसंघाच्या राजकीय भवितव्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्य म्हणजे बैठकीला माजी आमदार प्रसाद गांवकर उपस्थित राहिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यापासून राजकीय आणि सार्वजनिक कार्यापासून प्रसाद गावकर अलिप्तच होते.
येत्या 2027 विधानसभा निवडणुकांसाठी सांगे तालुक्यातील अनुसूचित जमाती समाजाची मोर्चेबांधणी सुऊ झाली आहे. बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश केपेकर, अॅड. आनंद गावंकर तसेच अनुसूचित जमाती समाजातील इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करताना सुरेश केपेकर यांनी सांगितले की, भाजप अनुसूचित जमाती समाजाला राजकीय आरक्षण देण्याच्या दिशेने कार्यरत असून, या प्रक्रियेबाबत त्यांनी विश्वास व्यक्त केला. तसेच, आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाने एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
अॅड. आनंद गावंकर यांनी सांगितले की, जर अनुसूचित जमाती समाजाला राजकीय आरक्षण मिळाले नाही, तर 2027 च्या विधानसभा निवडणुकीत समाजाकडून एकमताने एकच उमेदवार उभा केला जाईल आणि विद्यमान आमदार सुभाष फळदेसाई यांच्याविऊद्ध निवडणूक लढविली जाईल. त्यांनी सांगे मतदारसंघात एसटी समाजाचा उमेदवार विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला. बैठकीत राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, काँग्रेस तिकिटीसाठी इच्छुक उमेदवार सत्यवान गांवकर यांनी मतदारसंघातील विविध भागांमध्ये कोपरा सभा घेण्यास सुऊवात केली असून, निवडणूक प्रचाराचा एक भाग म्हणून अनेक बॅनरही लावले आहेत. त्यांनाही एसटीच्या समूहाबरोबर राहण्याचे सांगण्यात आले आहे. एसटी समाजाची एकजूट कायम ठेवण्यावर भर देण्यात आला.