For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेशभक्तांच्या खिशाला एसटीचा ४३.५० टक्के फटका!

गणेशभक्तांच्या खिशाला एसटीचा ४३ ५० टक्के फटका
Advertisement

मालवण प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांना यंदा एसटी महामंडळाने मोठा आर्थिक धक्का दिल्याचा आरोप गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाने केला आहे. १७ जुलै २०२६ पासून करण्यात आलेल्या १३.५० टक्के कायमस्वरूपी भाडेवाढीनंतर आता गौरी-गणपती सणासाठी ग्रुप पद्धतीने गावी जाणाऱ्या प्रवाशांवर आणखी ३० टक्के अतिरिक्त अधिभार लावण्यात आल्याने एकूण ४३.५० टक्के वाढीचा भार प्रवाशांवर पडत असल्याचा दावा संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केला आहे.

Advertisement

गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाच्या माध्यमातून कोकणात जाण्यासाठी ७०० हून अधिक गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून हे नियोजन एसटी महामंडळाकडे देण्यात आल्याचे संघाने सांगितले आहे. संघाच्या म्हणण्यानुसार, एसटीच्या नियोजनानुसार ग्रुप बुकिंग १ ऑगस्टपासून सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अतिरिक्त ३० टक्के अधिभाराच्या निर्णयामुळे ग्रुप बुकिंगला तब्बल २० ते २२ दिवसांचा विलंब झाला. ३० टक्के अतिरिक्त अधिभाराचा निर्णय प्रवाशांना किंवा माध्यमांना आधी सार्वजनिकपणे का सांगण्यात आला नाही, असा सवालही संघाने उपस्थित केला आहे. ग्रुप बुकिंगसाठी गेलेल्या प्रवाशांना प्रत्यक्ष बुकिंगच्या वेळी वाढीव भाड्याचा धक्का बसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जर निर्णय योग्य आणि नियमांनुसार असेल, तर तो सार्वजनिकपणे जाहीर करण्यास महामंडळाला अडचण काय होती? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

प्रवासी आमचे दैवत म्हणायचे आणि त्याच दैवताच्या खिशावर ४३.५० टक्के वाढीचा भार टाकायचा, हा कोणता प्रवासी सेवाधर्म? असा थेट सवाल गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष दीपक चव्हाण यांनी केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांना दिलासा मिळणार की वाढीव भाड्याचा आणखी एक धक्का, याकडे आता लाखो गणेशभक्त प्रवाशांचे लक्ष लागले आहे.अशी माहिती दीपक चव्हाणकार्याध्यक्ष, गणेशभक्त कोकणवासिय प्रवासी संघ यांनी दिली आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.