सिंधुदुर्गात लवकरच धावणार एसटी महामंडळाच्या मिनी बस
पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक; बस स्थानकांची होणार डागडुजी व सुशोभीकरण
कणकवली /प्रतिनिधी
सिंधुदुर्गात लवकरच एसटी महामंडळाच्या मिनी बसेस दाखल होणार आहेत. जिल्ह्यातील काही बसस्थानकांची डागडुजी व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भिमणवार यांची विधानभवनातील आपल्या दालनात बैठक घेऊन चर्चा केली.या बैठकीत जिल्ह्यातील एसटी सेवांबाबत आणि कारभाराबाबत चर्चा केली. पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात मिनी बस सेवा सुरू करणे तातडीची गरज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या मागणीला एसटी महामंडळाच्या संचालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मिनी बस सेवा सुरू करण्याचे सांगितले.पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील काही बसस्थानके दुरावस्थेत असल्याचे ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या बसस्थानकांची तात्काळ डागडुजी करून सुशोभीकरण करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी दिल्या. गावा गावांचा संपर्क वाढविण्यासाठी बसेच्या फेऱ्यात वाढ करण्याच्या सूचना ही पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रिक्त असलेले विभाग नियंत्रक पद तात्काळ भरण्याच्या सूचना ही अधिकाऱ्यांना दिल्या.