कराड-चिपळूण मार्गावरून आता एसटी धावणार
नवारस्ता :
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील कोयना विभागातील वाजेगाव नजीकच्या नवीन पुलाच्या कामाच्या ठिकाणचा पर्यायी वळण रस्ता अतिवृष्टीने वाहून गेल्याने कोकणाला जोडणारा महत्वपूर्ण असा हा महामार्ग काही दिवस बंद होता. या महामार्गावरून कोकणात जाणारी व कोकणातून कराडच्या दिशेने येणारी एसटीची वाहतूक देखील पूर्णपणे बंद होती. मात्र अखेर महामार्गावरील आवश्यक त्या ठिकाणच्या रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने तब्बल पंधरा दिवसानंतर या महामार्गावरील एसटीची वाहतूक सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोयना विभागात १५ व १६ जून रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे कराड-चिपळूण महामार्गावरील वाजेगावनजीक सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणचा पर्यायी वळण रस्ताच पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याने कराडवरून चिपळूणकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. परिणामी महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. चिपळूणकडून कराडकडे जाणारी छोटी वाहतूक संगमनगर, मणेरी, नेरळे, मोरगिरी या पर्यायी मार्गाने वळवली होती. हा पर्यायी मार्ग वळणावळणाचा व अरूंद असल्याने या मार्गावरून अवजड वाहतूक अशक्य होती. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने प्रशारानाचीही मोठी कसोटी होती. हा महामार्ग पूर्ववत करण्यासाठी महामार्गाचे प्रशासन भर पावसात प्रयत्न करत होते. दोन दिवसानंतर याचठिकाणी नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला भराव टाकून हा पूल छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला होता. मात्र याच महामार्गावरील शिरळ याठिकाणी देखील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तेथेही पर्यायी मार्ग करण्यात आला होता. त्याठिकाणचाही भराव वाहून गेल्याने वाहतुकीस धोका निर्माण झाला होता. पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यानंतर ठेकेदाराने धोकादायक ठिकाणच्या डागडुजीची कामे युध्दपातळीवर हाती घेत जेसीबी आणि पोकलैंडच्या साह्याने महामार्गावरील वाजेगाव, शिरळसह अन्य ठिकाणचे रस्ते, भराव तसेच ज्या ज्या ठिकाणी पावसामुळे धोका, अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणची धोकादायक वळणे, अडचणी काढून प्रशासनाकडून महामार्ग मजबुतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
या महामार्गावर तीन ते चार दिवसानंतर अवजड वाहनांची चाचणी घेऊन टप्याटप्याने अवजड वाहने सोडण्यात येत होती. मात्र तरीही भराव खचत असल्याने अवजड वाहतूक काही दिवस बंद ठेवण्यात आली होती. शिवाय या महामार्गावरील एसटीची वाहतूक पूर्णपणे बंदच करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले. शालेय विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झाले. याशिवाय एसटी आगाराचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या या महामार्गावरील धोकादायक ठिकाणची कामे पूर्ण झाल्याने तब्बल पंधरा दिवसानंतर या मार्गावरील एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
- पालकमत्र्यांची करडी नजर
या महामार्गावरील रस्ता वाहून गेल्याने महामार्गच बंद होता. त्यादरम्यान राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सातत्याने या कामाकडे लक्ष होते. त्यामुळे कधी मुंबईतून दुरदृश्य प्रणालीद्वारे तर कधी थेट भेट देऊन संबंधित महामार्ग प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी यांना हा महामार्ग तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अखेर तब्बल १५ दिवसानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.