साटेलीत एसटी - आयशर टेम्पोचा अपघात
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
सातार्डा -
सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा - मळेवाड रस्त्यावर साटेली येथे बस स्टॉपजवळ एसटी बस आणि आयशर टेम्पोमध्ये शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात बसमधील काही प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, शनिवारी सकाळी ६ वाजता वेंगुर्ले येथून पणजी (वास्को) येथे जाणारी एसटी बस आणि चिरे वाहतूक करणारा आयशर टेम्पो साटेली देऊळवाडी येथील वळणावर सकाळी ७.३० च्या सुमारास समोरासमोर धडकले. या अपघातात दोन्ही वाहनांचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच सातार्डा पोलीस ठाण्याचे सहा. उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर, सुभाष नाईक, कॉन्स्टेबल राहुल बर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिक तपास सुरू केला आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झुडुपांकडे लक्ष वेधले आहे. झाडे वाढल्यामुळे वाहन चालकांना समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बांधकाम विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.