थोडावेळ काळजाचा ठोका चुकला! सुपे घाटात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस पलटी; चार विद्यार्थी जखमी, एकीवर शस्त्रक्रिया
बारामती : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटातील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन घाटाखाली कोसळल्याची घटना घडली. या अपघातात चार विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर केडगाव चौफुला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दौंड तालुक्यातील पडवी, कुसेगाव परिसरातील विद्यार्थ्यांना घेऊन एसटी बस सकाळी सुमारे ८ वाजता सुपेच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीतील अंदाजे २५ ते ३० विद्यार्थी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुपे घाटात बसने पहिले वळण व्यवस्थित पार केले. मात्र, दुसऱ्या वळणावर चढ चढताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस मागे सरकली.
घाटातील रस्त्याच्या कडेला कठडा नसल्याने बस रस्त्यावरून खाली गेली आणि दोन वेळा पलटी होऊन सुमारे २० ते २२ फूट अंतरावर घाटाखाली जाऊन थांबली. अचानक झालेल्या अपघातामुळे बसमधील विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण झाली.
अपघाताची माहिती मिळताच घाटातून जाणारे नंदकुमार शितोळे आणि नितीन शितोळे यांनी तातडीने परिसरातील ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पालकही घटनास्थळी पोहोचले. यातील चार विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतर विद्यार्थ्यांना पालकांसोबत घरी पाठवण्यात आले.
जखमी विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट
राष्ट्रवादीचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांशीही संवाद साधला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य आणि जखमी विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. त्यांनी अपर पोलिस अधीक्षक तसेच विद्या प्रतिष्ठानच्या शाळेचे मुख्याध्यापक योगेश पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आणि आवश्यक ते उत्तम उपचार मिळावेत, यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या.
सुपे घाटाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
युगेंद्र पवार यांनी सुपे-पडवी घाट परिसरात यापूर्वीही अपघात झाल्याचे सांगत या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त केली. घाटातील वळणे, रस्त्याची रचना आणि अपघातप्रवण ठिकाणांचा आढावा घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.
सुपे घाटाचा मार्ग अधिक सुरक्षित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, घाटाचे लवकरात लवकर सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.