विरोधकांमुळे वेळ गेल्याने एसटी विधेयक लांबणीवर
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची माहिती
मडगाव : संसदेत पुरेशी वेळ न मिळाल्याने गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीसाठी (एसटी) मतदारसंघ आरक्षित ठेवण्याची तरतूद असलेले ‘गोवा विधानसभा अनुसूचित जमाती प्रतिनिधीत्व मतदारसंघ पुनर्रचना विधेयक 2024’ लांबणीवर पडल्याची माहिती केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली. पुढील अधिवेशनात हे विधेयक संमत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीपाद नाईक हे एका कार्यक्रमानिमित्त मडगावात आले असता त्यांनी ही माहिती दिली. केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गेल्या सोमवारी लोकसभेत हे विधेयक मांडले होते. संसदेचे कामकाज सुरू असताना सातत्याने विरोधकांकडून व्यत्यय येऊ लागला. त्यात बरीच वेळ वाया गेली. परिणामी एसटी आरक्षणाचे विधेयक लांबणीवर पडले. पुढील अधिवेशनात हे विधेयक नक्कीच संमत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.