For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी परीक्षेचा निकाल ९४.५१ टक्के

03:14 PM Apr 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहावी परीक्षेचा निकाल ९४ ५१ टक्के
Advertisement

एकूण 550 पैकी 543 दिव्यांग मुले झाली यशस्वी: विशेष मुलांच्या तिन्ही शाळांचा 100 टक्के निकाल

Advertisement

  • राज्यातील 178 शाळांनी मिळविले 100 टक्के यश
  • एकूण 417 जणांना मिळाली एटीकेटी परीक्षेची संधी
  • विविध कारणांमुळे 191 विद्यार्थ्यांचा निकाल राखून
  • शंभर टक्के निकाल देण्यात फोंडा प्रथम, तिसवाडी द्वितीय
  • तब्बल 6637 जणांना क्रीडागुणांचा लाभ, 67 जण उत्तीर्ण
  • निकालाबाबत शंका निरसनासाठी शाळांनी समिती स्थापावी

पणजी : गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (गोवा बोर्ड) मार्च - एप्रिल 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून त्यात 94.51 टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गोवा बोर्डाच्या पर्वरी येथील कार्यालयात बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी पत्रकार परिषदेत हा निकाल जाहीर करुन त्याची तपशिलवार माहिती दिली. काही विषय घेऊन 211 खासगरी (रिपीटर) उमेदवारांनी परीक्षा दिली होती. त्यातील 108 जण पास झाले, तर 35 जणांचे निकाल राखून ठेवले आहेत. सर्व विषय घेऊन एकूण 815 जणांनी परीक्षा दिली होती. त्यातून 255 जणांनी पास होण्यात यश मिळवले तर 63 जणांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. एकूण 550 दिव्यांग मुलांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 543 जणांनी पास होऊन यश प्राप्त केले. त्यांची टक्केवारी 98.73 टक्के एवढी आहे, असे शेटये म्हणाले.

विशेष मुलांच्या शाळांचा 100 टक्के निकाल

Advertisement

विशेष मुलांची शाळा संजय स्कूल, पर्वरी आणि लोकविश्वास प्रतिष्ठान, ढवळी फोंडा यांच्या दोन शाळा मिळून तिन्ही शाळांनी 100 टक्के निकाल दिला आहे. त्यातील परीक्षा दिलेल्या अनुक्रमे 41, 9 आणि 3 अशा सर्वांनी दहावी परीक्षेत पास होण्याचा पराक्रम केला.

एकूण 417 जणांना मिळाली एटीकेटीची संधी

एका किंवा दोन विषयात नापास झालेल्यांना एटीकेटी देण्यात आली असून त्यांची संख्या 417 एवढी आहे. त्यांना अकरावीत प्रवेश घेण्याची सुविधा देण्यात आली असून अकरावी निकाल लागण्यापूर्वी त्यांनी नापास झालेले विषय सोडवावेत, अशी अट घालण्यात आली आहे.

तब्बल 6637 जणांना क्रीडागुणांचा लाभ

या निकालातून 6637 जणांना क्रीडागुणांचा लाभ झाला. त्यामुळे 67 जण उत्तीर्ण होण्यात यशस्वी झाले. पुरवणी परीक्षेची अंदाजे तारीख 6 जून अशी निश्चित करण्यात आली असून त्यासाठी सर्व विषय घेऊन बसता येऊ शकते किंवा एटीकेटीसाठी पात्र ठरलेले बसू शकतात आणि एक - दोन नापास विषय सोडवता येतात. आजारी किंवा इतर काही कारणाने परीक्षा चुकल्यास त्यांनी त्या पुरवणी परीक्षेला बसावे, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

उत्तर पत्रिकांची फोटो

कॉपी हवी असेल तर 2 मेपर्यंत अर्ज करावेत आणि त्यासाठी प्रतिविषय रु. 350 फी आहे. उत्तर पत्रिकांची फेरतपासणी करण्यासाठी प्रति विषय रु. 700 फी असून त्याकरीता अर्ज करण्याची मुदत 11 मेपर्यंत आहे. गुणांची फेरतपासणी करण्यासाठी प्रति विषय रु. 100 भरावे लागणार असून त्याची अर्ज करण्याची मुदत 2 मे अशी आहे. सर्व अर्ज शाळेमार्फत ऑनलाईन स्वरुपात करावेत, अशी सूचना बोर्डाने केली आहे.

शंका निरसनासाठी शाळांनी समिती स्थापावी

दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी, त्यांचे पालक यांच्या जर काही शंका, समस्या असतील तर त्यांचे निरसन करण्यासाठी शाळांनी तीन सदस्यीय समिती स्थापन करावी, अशी सूचना गोवा बोर्डाने सर्व शाळांना केली आहे. त्या समितीत एक महिला सदस्य, शाळेतील समुपदेशकाचा समावेश असावा. विद्यार्थी व पालकांनी शंकांचे निरसन व्हावे म्हणून त्या समितीला भेटावे किंवा त्यातील एका सदस्याकडे व्यथा मांडावी.पत्रकार परिषदेला शेटये यांच्या समवेत सचिव विद्यादत्त नाईक, उपसचिव भारत चोपडे व साहाय्यक सचिव रिमा मडगांवकर यांची हजेरी होती.

बारावीची पुरवणी परीक्षा 6 मे पासून

‘नीट’ या महत्त्वाच्या परीक्षेसाठी गोवा बोर्डाने येत्या 27 एप्रिलपासून निश्चित केलेली बारावीची पुरवणी परीक्षा (सप्लीमेंटरी) पुढे ढकलली असून ती आता येत्या 6 मेपासून सुरु होणार आहे. सदर परीक्षा 16 मेपर्यंत चालणार आहे. यंदाची बारावी पुरवणी परीक्षा म्हापसा आणि मडगाव या दोन केंद्रातून घेण्यात येणार आहे. सकाळी 9.30 ते दुपारी 12.30 अशी पुरवणी परीक्षेची वेळ आहे, असे बोर्डाचे अध्यक्ष भगिरथ शेटये यांनी कळवले आहे.

Advertisement
Tags :

.