जातनिहाय जनगणना पुनर्गणतीची श्रीशैल पीठाच्या जगद्गुरुंची मागणी
गणती समाधानकारक झाली नसल्याचा आक्षेप
बेळगाव : जातनिहाय जनगणना समाधानकारक झाली नाही. त्यामुळे फेरगणती करूनच त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी श्रीशैल पीठाचे जगद्गुरु श्री. डॉ. चन्नसिद्धराम शिवाचार्य भगवद्पाद यांनी केली आहे. सोमवारी बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना श्रीशैल जगद्गुरु पुढे म्हणाले, सध्या जातनिहाय जनगणनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अवैज्ञानिक पद्धतीने केलेली ती एक गणती आहे, अशी आमची भावना आहे. आमचे मठाधीश व अ. भा. वीरशैव महासभेचा अभिप्रायही असाच आहे. या अभिप्रायाचा आपण पाठपुरावा करतो. यासंबंधी समाजातील ज्येष्ठ, मठाधीश यांच्याबरोबर चर्चा करून या मुद्द्यावर काय करायचे, हे ठरविण्यात येणार आहे. कर्नाटकातील बहुतेकांना या अहवालाबद्दल असंतोष आहे. विरोध डावलून जर त्याची अंमलबजावणी करणारच असतील तर कोणता निर्णय घ्यायचा, तो घेऊ. फेरगणतीसाठी वीरशैव महासभेच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणला जात आहे. जे अल्पसंख्याक आहेत त्यांना बहुसंख्याक ठरविण्यात येत आहे. महासभेच्या अधिवेशनातच आम्ही याचा निषेध केला होता. यासंबंधी महासभेशी सतत चर्चा करण्यात येत असून कोणता निर्णय घ्यायचा, हे लवकरच कळविण्यात येईल, असे जगद्गुरुंनी सांगितले. यावेळी हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी उपस्थित होते.