श्रीरामुलूंची बंडाळीची भाषा
राज्य भाजप कार्यकारिणी बैठकीत अपमान झाल्याने संपप्त : पक्ष सोडण्याचा इशारा
प्रतिनिधी/ बेंगळूर
पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत माझा अपमान करण्यात आला आहे, असे सांगून माजी मंत्री बी. श्रीरामुलू यांनी राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. बैठकीत माझा अपमान करण्यात आला. जनार्दन रे•ाr मला टार्गेट करत आहेत. विजयेंद्र हे माझ्या बाजूने नाहीत. मी पक्ष सोडेन. तुम्हाला मी नको असेल तर सांगा, अशी शब्दात श्रीरामुलूंनी बंडाळीची भाषा केली आहे.
मंगळवारी बेंगळूरमध्ये राज्य भाजपमधील अंतर्गत गटबाजीसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. बैठकीतील घडमोडींवर माजी मंत्री बी. श्रीरामुलू यांनी बुधवारी पत्रकारांसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. संडूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील पराभवाला श्रीरामुलू कारणीभूत असल्याची तक्रार भाजपचे पराभूत उमेदवार बंगारु हनुमंत यांनी हायकमांडकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर राधामोहनदास अगरवाल यांनी श्रीरामुलूंना कार्यकारिणी बैठकीवेळी फैलावर घेतले होते. यामुळे नाराज झालेल्या श्रीरामुलूंनी पराभवामुळे मी आधीच दु:खात आहे. अशा प्रसंगी आरोप करणे योग्य नाही, असे सांगितले आहे.
माजी मंत्री जनार्दन रेड्डी यांच्या भाजप प्रवेशाला श्रीरामुलू अडसर ठरले होते, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे जनार्दन रे•ाr आणि श्रीरामुलू यांच्यात मागील दोन वर्षांपासून दुरावा निर्माण झाला आहे. नंतर जनार्दन रेड्डी यांनी कोप्पळ जिल्ह्याच्या गंगावती मतदारसंघातून नवा पक्ष बांधून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मंगळवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या कार्यकारिणी बैठकीत राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल यांनी श्रीरामुलूंना फैलावर घेतल्याचे सुत्रांकडून समजते. बळ्ळारी जिल्ह्याच्या संडूर मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीत बंगारु हनुमंत यांच्या पराभवावर बैठकीत चर्चा झाली. पोटनिवडणूक निकालानंतर बंगारु हनुमंत यांनी हायकमांडकडे श्रीरामुलूंविरुद्ध तक्रार केली होती. बैठकीत या तक्रारीचा मुद्दा उपस्थित झाला. राधामोहनदास यांनी श्रीरामुलूंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित पेले. त्यामुळे संतप्त झालेले श्रीरामुलू बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देण्यास पुढे सरसावले. त्यावेळी त्यांना श्रीरामुलू व विजयेंद्र यांनी रोखले होते. त्यामुळे बुधवारी बेंगळुरात पत्रकारांशी बोलताना श्रीरामुलूंनी नाराजी उघड करत पक्ष सोडण्याची भाषा केली आहे.
तुम्ही स्वत:च समस्या सोडवा!
स्वार्थासाठी सुरु असलेल्या अंतर्गत कलहात राष्ट्रीय नेते कोणताही हस्तक्षेप करणार नाही. तुम्ही स्वत:च समस्या सोडविल्या पाहिजेत, अशी ताकीद राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास अगरवाल यांनी राज्य नेत्यांना दिली आहे. मंगळवारी रात्री कार्यकारिणी बैठकीत राज्य भाजपच्या नेतृत्त्वाविरुद्ध बंड होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावेळी राधामोहनदास यांनी या कृत्यातून पक्षाचे नुकसान होणार नाही. तुम्हीच ही समस्या सोडवा. यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले.