ट्रंप यांच्या सल्लागारपदी श्रीराम कृष्णन
► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्वत:च्या सल्लागार मंडळात भारतीय वंशाचे विख्यात तंत्रज्ञ श्रीराम कृष्णन यांची निवड केली आहे. ते ट्रंप यांच्या टीममधील सहावे भारतीय वंशाचे नागरीक आहेत. ते ट्रंप यांचे ‘कृत्रिम बुद्धीमत्ता धोरण सल्लागार’ म्हणून काम पाहतील. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा विजय मिळविलेले डोनाल्ड ट्रंप हे 20 जानेवारीला अध्यक्ष होणार आहेत.
कृष्णन यांची नियुक्ती ट्रंप प्रशासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या धोरण कक्षात करण्यात आली आहे. कृष्णन हे अभियंते असून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानातील नामवंत तज्ञ मानले जातात. ते डेव्हीड सॅक्स या प्रसिद्ध तज्ञांसह या विभागात काम करणार आहेत. कृष्णन यांच्यावर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाप्रमाणेच आभासी चलन धोरणावरही ट्रंप यांना सल्ला देण्याचे उत्तरदायित्व सोपविण्यात आले आहे. स्वत: ट्रंप यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे.
सिलिकॉन व्हॅलीतील मान्यवर
श्रीराम कृष्णन यांचा जन्म तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे झालेला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ म्हणून त्यांचा अमेरिकेच्या जगप्रसिद्ध सिलीकॉन व्हॅलीत दबदबा आहे. ते धोरणत्मक विचारवंत म्हणून ज्ञात आहेत. त्यांनी फेसबुक, ट्विटर आणि स्नॅप आदी जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये कार्यकारी आणि उच्च पदांवर काम केले आहे. फेसबुक कंपनीत त्यांनी फेसबुक प्रेक्षकवर्ग नेटवर्क निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे. यामुळे त्यांनी फेसबुकला गुगलच्या स्पर्धेत उभे करण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे. ट्विटरमध्येही त्यांनी युजर एंगेजमेंट क्षेत्रात महत्वाचे कार्य केले. नंतर त्यांनी काही काळ आपले क्षेत्रपरिवर्तन करुन अँडरसन होरोव्हिट्झ या सिलिकॉन व्हॅलीतील महत्वाच्या भांडवल पुरवठा कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीतही उच्च पदावर काम केले. ते या कंपनीचे भागीदारही आहेत. याच कंपनीत असताना त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि आभासी चलन (क्रिप्टो करन्सी) या क्षेत्रांमधील तज्ञ म्हणून नावलौकिक मिळविला. ही दोन क्षेत्रे आज तंत्रज्ञान क्षेत्राचे भविष्य म्हणून पाहिली जातात. या कंपनीच्या विस्तारामध्येही कृष्णन यांचे योगदान श्रेष्ठ मानले जात आहे. अशा प्रकारे त्यांना सॉफ्टवेअर उद्योगापासून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानापर्यंत साऱ्याचा अनुभव आहे.
कृत्रिम बुद्धीमत्तेविषयी मते
आज जगाचे राजकारण, अर्थकारण, तंत्रज्ञान क्षेत्र, स्पर्धात्मकता, आर्थिक विकास आदी सर्व क्षेत्रांवर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा मोठा प्रभाव पडत आहे. अमेरिका आज या तंत्रज्ञानात अग्रेसर आहे. अशा स्थितीत अमेरिकेच्या अध्यक्षांच्या सल्लागारपदी श्रीराम कृष्णन यांची नियुक्ती होणे, हे असाधारण मानले जात आहे. कृष्णन यांची या तंत्रज्ञानासंबंधीची मते सकारात्मक आहेत. भांडवल पुरवठादार कंपनीत काम करताना त्यांनी कृत्रिम बुद्धीमत्ता या विषयाची क्षमता ओळखली होती. या तंत्रज्ञानात जगाच्या औद्योगिक क्षेत्राचा चेहरा मोहरा परिवर्तित करण्याची क्षमता आहे, हे त्यांनी जाणले आहे. त्यामुळे अमेरिकेला या क्षेत्रात जगाच्या पुढे ठेवण्याचे उत्तरदायित्व त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे, असे मानण्यात येते.
पुढचे दशक कृत्रिम बुद्धीमत्तेचे
कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत आहे, असेच मानले जाते. मात्र, या तंत्रज्ञानाचा विकसीत होण्याचा वेग कल्पनातीत आहे. जवजवळ प्रतिदिन या क्षेत्रात कोणतातरी नवा शोध लागत असून पुढचे दशक हे सर्वार्थाने या तंत्रज्ञानाचे आहे, असे मानण्यात येते. या क्षेत्रात सध्या अमेरिका आणि चीन हे दोन देश पुढे आहेत. भारतासह इतर देशांमध्येही संशोधन केले जात आहे. कृषी पासून शिक्षण आणि आरोग्यापर्यंत पुढच्या काळात सर्व महत्वाच्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा बोलबाला राहील अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे श्रीराम कृष्णन यांच्यावर हे महत्वाचे उत्तरदायित्व असल्याची चर्चा औद्योगिक वर्तुळात केली जात आहे.