For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीपादभाऊंची डबल हॅट्ट्रिक, दक्षिणेत काँग्रेस

12:18 PM Jun 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीपादभाऊंची डबल हॅट्ट्रिक   दक्षिणेत काँग्रेस
Advertisement

उत्तर मतदारसंघात रमाकांत खलप तर दक्षिणेत पल्लवी धेंपे पराभूत

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीतील गोव्यातील दोन जागांसाठी झालेल्या मतदानात उत्तर गोव्यात पेंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे 1 लाख 13 हजारांचे मताधिक्य मिळवून 6 व्यांदा विजयी झाले आहेत. मात्र साऱ्यांच्या नजरा लागून राहिलेल्या दक्षिण गोव्यात भाजपला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना 2,01,376 मते तर काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी 2,13,678 मतांसह पराभव केला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात दोन वेळा येऊन सभा घेतल्या होत्या, तरी देखिल हिंदू मतदारांनी दक्षिण गोव्यात भाजपला उत्स्फूर्त साथ दिली नसल्याने भाजपचा सुमारे 12 हजार मतांच्या फरकाने पराभव झाला. गोव्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान तिसऱ्या टप्प्यात दि. 7 मे रोजी झाले होते. काल मंगळवारी निकाल झाल्यानंतर भाजपला दोन्ही ठिकाणी यश मिळेल, असा अंदाज फोल ठरला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दोन्ही लोकसभा मतदारसंघांत विजयासाठी अथक प्रयत्न केले होते. खुद्द मुख्यमंत्र्यांनी ‘मिशन दक्षिण गोवा’ धोरण राबविले होते. त्यांनी वारंवार दक्षिण गोव्यातील मतदारसंघांमध्ये जाऊन तळ ठोकला होता. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. भाजपला हिंदू मतदारांनी जेवढ्या उत्स्फूर्तपणे साथ दिली पाहिजे होती तेवढी दिली नसल्याने पराभव झाला.

भाजपसाठी ठरला मोठा धक्का

Advertisement

कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना काँग्रेस पक्षाने निवडणुकीत उभे पेले होते. त्यांना राजकारणाचा फारसा अनुभव नव्हता. भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय पातळीवऊन दक्षिण गोवा उमेदवार निवडण्याचा निर्णय स्वत:च्या हाती घेतला. जी व्यक्ती पक्षाची कार्यकर्तादेखील नाही व राजकारणाशी सूतराम संबंध नसलेल्या उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांच्या पत्नी पल्लवी धेंपे यांना निवडणुकीत उतरविले. खुद्द पंतप्रधानानी दोन वेळा सभा याच एकमेव मतदारसंघात घेऊनदेखिल त्यांचा पराभव झाल्याने भाजपसाठी हा धक्का मानला जातो.

काँग्रेसला आप, गोवा फॉरवर्डची साथ

या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही पक्षांनी साथ दिली. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांच्यासाठी या पक्षांच्या नेत्यांनी प्रचार केला व त्यांना विजयी केले. मंगळवारी सकाळी 8 वा. दक्षिण गोव्यात मडगाव येथे व उत्तर गोव्यात पणजी येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. त्याच दरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी 10 वाजेपर्यंत मतमोजणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. त्यात उत्तरेत भाजप आणि दक्षिणेत काँग्रेस आघाडीवर राहिला. उत्तरेत भाजपने सातत्याने आघाडी घेतली. दक्षिण गोव्यात फर्नांडिस यांनी सालसेत तालुक्यात मडगाव वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघांत आघाडी मिळविली. त्याशिवाय केपे व कुठ्ठाळी या इतर दोन मतदारसंघामध्ये देखील काँग्रेसने आघाडी मिळावली.

उत्तर गोव्यात श्रीपादभाऊंची डबल हॅट्ट्रिक

उत्तर गोव्यातून भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी विजयाची डबल हॅट्ट्रिक साधत स्वत:च्या नावावर अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. ही विजयश्री खेचून आणताना त्यांनी निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांचा एक लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या दोन्ही उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा रिव्होल्युशनरी गोवन्सचे उमेदवार तुकाराम परब यांनी प्राप्त केलेल्या मतांची संख्या पाहून लोक अचंबित झाले. परब यांनी तब्बल 45 हजार मते प्राप्त केली असून ही जादू म्हणजे राज्यात त्या पक्षाचे प्राबल्य वाढत असल्याचा पुरावा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतांना कानी पडत होत्या.

तब्बल 6297 जणांना आठही उमेदवार नापसंत

उर्वरीत पाच उमेदवारांची कामगिरी मात्र जवळजवळ नगण्य म्हणावी अशीच नोंद झाली. मतदारांनी या पाचही उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षा जास्त मते ‘नोटा’च्या पदरात टाकली. सुमारे 6297 जणांनी नोटा पर्याय निवडून एकूण 8 पैकी एकही उमेदवार पसंत नसल्याचे मत नोंदविले. काल मतमोजणीच्या दिवशी सकाळीच धुंवाधार कोसळला. पावसामुळे मतमोजणीसाठी येण्याच्या तयारीत असलेले कार्यकर्ते आणि समर्थकांचा काहीसा हिरमोडच झाला होता. त्याही परिस्थितीत बरेच कार्यकर्ते, समर्थक मतमोजणी केंद्राकडे दाखल झाले होते.  उत्तर गोव्यातील मतमोजणी आल्तीनो येथील सरकारी तंत्रनिकेतन इमारतीत पार पडली. त्यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीत उत्तर गोव्यातून 8 उमेदवारांनी स्वत:च्या नशिबाची परीक्षा घेतली. त्यापैकी भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना नशिबाने जबरदस्त साथ दिली व ते चक्क सहाव्यांदा विजयी झाले. यावेळी जनतेने त्यांच्या पारड्यात 253812 मते टाकली. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार रमाकांत खलप यांच्यावर त्यांनी 113621 मतांची आघाडी मिळविली. खलप यांना 140191 मते प्राप्त झाली.

आरजीला मिळाली 45,460 मते

तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टीचे उमेदवार तुकाराम परब यांना 45460 मते प्राप्त झाली. उर्वरित पाच उमेदवारांमध्ये बहुजन समाज पार्टीच्या मिलन वायंगणकर यांना 1600 मते, अखिल भारतीय परिवार पार्टीचे सखाराम नाईक यांना 1404 मते व अन्य तीन अपक्ष उमेदवारांपैकी शकील शेख (800), थॉमस फर्नांडीस (746) आणि विशाल नाईक (744) अशी मते मिळाली. वरीलपैकी एकही उमेदवार मान्य नसलेल्या 6297 मतदारांनी नोटा पर्याय निवडला.

... तरीही दक्षिणेत पुन्हा काँग्रेस

भाजपच्या तुलनेत काँग्रेस पक्षात संघटनेचा अभाव, पैशांचा अभाव अशी परिस्थिती असतानाही दक्षिण गोव्यातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी भाजपच्या उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपो यांचा 13,535 मतांनी पराभव केला. भाजपने प्रथमच लोकसभा निवडणुकीत महिला उमेदवार देऊन एक प्रयोग करून पाहिला. मात्र, त्यांचा हा प्रयोग फसला. इंडिया आघाडी मजबूत झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

अल्पसंख्याक मतदार भाजपच्याविरोधात 

दक्षिण गोव्यातील निकालाने एक गोष्ट स्पष्ट केलीय, ती म्हणजे अल्पसंख्याक मतदार हे भाजपच्या विरोधात आहे. तसेच हिंदू मतदार एकसंघ नाहीत. भाजपला अनुकूल असलेल्या मतदारसंघात पक्षाची सुमार कामगिरी व मतदारांमध्ये भाजप सरकारबद्दल असलेली नाराजी ही निकालातून स्पष्ट झाली आहे. भाजपने आपल्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीरसभा दक्षिण गोव्यात घेतली. पण, ही सभादेखील दक्षिण गोव्यावर प्रभाव टाकू शकली नाही. यांच्या उलट इंडिया आघाडीच्या प्रचारात कोणीच मोठे नेते उतरले नव्हते. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅल्टन डिकॉस्ता, आमदार विजय सरदेसाई, आमदार कॅप्टन व्हेन्झी वियेसग व आमदार व्रुझ सिल्वा तसेच प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती.

फेंडा तालुक्यात भाजपचा अपेक्षाभंग

काल मंगळवारी मडगावच्या दामोदर महाविद्यालयात सकाळी मतमोजणीला प्रारंभ झाला, तेव्हा इंडिया आघाडीचे उमेदवार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सुरवातीपासूनच आघाडी घेतली ते शेवटपर्यंत कायम ठेवत भाजपच्या पल्लवी धेंपो यांचा पराभव केला. भाजपला अनुकूल असलेल्या मतदारसंघांतही चांगली कामगिरी करता आली नाही. भाजपला फोंडा तालुक्यात मोठ्या आघाडीची अपेक्षा होती. फोंडा, शिरोडा व मडकई या तीन मतदारसंघात मिळून भाजपला किमान 30 हजार मतांची आघाडी अपेक्षित होती. मात्र, फक्त मडकई मतदारसंघात वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी भाजपला 10748 मतांची आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी सर्वाधिक ठरली. फोंडात कृषीमंत्री रवी नाईक यांनी केवळ 4756 तर शिरोड्यात जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी 4985 मतांची आघाडी मिळवून दिली.

मुरगावातही अपेक्षित आघाडी नाही

मुरगांव तालुक्यातील मुरगांव, वास्को, दाबोळी या तीनच मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली तरी ती अपेक्षित आघाडी नव्हती. मुरगांवमध्ये 2065, वास्कोत 3231 तर दाबोळीत 2724 मतांची आघाडी मिळाली. कुठ्ठाळी मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली. कुठ्ठाळी मतदारसंघाचे आमदारांचे समर्थन भाजपला होते. मात्र, तेही भाजला आघाडी मिळवून देऊ शकले नाही.

मडगावात दिगंबर कामत यांना धक्का

सासष्टील आठ मतदारसंघात सर्वाच्या नजरा मडगाव मतदारसंघावर होत्या. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले आमदार दिगंबर कामत भाजपला किमान पाच हजार मतांची आघाडी मिळवून देणार, अशी अपेक्षा होती ती फोल ठरली. भाजपला केवळ 86 मतांची आघाडी मिळाली. दिगंबर कामत यांचे वर्चस्व असलेल्या मोती डोंगरावर त्यांची पिछेहाट झाली. हा निकाल नक्कीच आमदार कामत यांना धक्का देणारा ठरला.

फातोर्डा मतदारसंघावर आमदार विजय सरदेसाई यांची पकड मजबूत असल्याचे या निकालाने स्पष्ट केले. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना 2437 मतांची आघाडी त्यांनी मिळवून दिली. या मतदारसंघात भाजपला किमान 1 हजार मतांची आघाडी मिळणार अशी अपेक्षा होती ती फोल ठरली. नावेली मतदारसंघात भाजपचा आमदार असताना देखील काँग्रेसला 5770 मतांची आघाडी मिळाली.

सिक्वेरा मंत्री असूनही भाजपला लाभ नाही

नुवे मतदारसंघाचे आमदार आलेक्स सिक्वेरा हे भाजप सरकारात मंत्री असूनही ते इंडिया आघाडी उमेदवारीची मोठी आघाडी रोखू शकले नाहीत. या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 10,895 मतांची आघाडी मिळाली. तशीच परिस्थिती कुडतरी मतदारसंघाची होती. या ठिकाणी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे भाजपला समर्थन देत आहे. तेही काँग्रेस उमेदवाराची आघाडी रोखू शकले नाहीत. या मतदारसंघात काँग्रेसला 9185 मतांची आघाडी मिळाली.

सासष्टी पुन्हा ठामपणे काँग्रेसबरोबर 

बाणावली व वेळळी या दोन मतदारसंघात आपचे आमदार आहेत. या दोन्ही मतदारसंघात इंडिया आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड आघाडी मिळवून दिली. बाणावलीत 14181 तर वेळळीत 13350 मतांची आघाडी मिळाली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव प्रतिनिधीत्व करीत असलेल्या कुंकळळी मतदारसंघात काँग्रेसला 6032 मतांची आघाडी मिळाली. सासष्टी ठाम पणे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षासोबत राहिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.

उर्वरीत मतदासंघांतही अपेक्षित आघडी नाही

केपे, कुडचडे, सावर्डे, सांगे व काणकोण या पाच मतदारसंघात भाजपला मोठ्या आघाडीची अपेक्षा होती ती पूर्णपणे फोल ठरली. केपे मतदारसंघात आमदार अल्टन डिकॉस्ता हे काँग्रेसला 784 मतांची आघाडी मिळवून देण्यात यशस्वी ठरले. कुडचडे मतदारसंघात आमदार नीलेश काब्राल यांनी फक्त 1697 मतांची आघाडी भाजपला मिळवून दिली. या मतदारसंघात भाजपला किमान सात ते आठ हजार मतांच्या आघाडीची अपेक्षा होती. सावर्डे मतदारसंघात भाजपला 9511 मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघात भाजपला अपेक्षित आघाडी मिळाली नाही. सांगे मतदारसंघात मंत्री सुभाष फळदेसाई असतानाही भाजपला दहा हजार मतांची आघाडी मिळविता आली नाही. या ठिकाणी 5320 मतांची आघाडी मिळाली. तर काणकोण मतदारसंघात सभापती रमेश तवडकर यांनी भाजपला 7132 मतांची आघाडी मिळवून दिली.

आरजीला उत्तरेत जोरदार प्रतिसाद राजकीय नेत्यांची डोकेदुखी वाढणार

या लोकसभा निवडणुकीत आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांनी 44598 मते मिळवून भाजप व काँग्रेसला धक्का दिला तर दक्षिण गोव्यात आरजीचे ऊबर्ट परेरा हेच खरे भाजपच्या विजयाच्या आड आले. त्यांनी 18679 मते मिळविल्याने भाजपच्या पराभवास कारणीभूत ठरले. प्रादेशिक पक्ष असला तरी देखील लोकसभा निवडणुकीत आरजीने दोन्ही लोकसभा मतदारसंघात मिळून 63277 मते प्राप्त केली. ही मते अत्यंत परिणाम करणारी आहेत. ही लोकसभा निवडणूक आहे हे माहीत असून देखील जनतेने या पक्षाच्या पारड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात मते घातली. यातील बहुतेक मते ही युवा मतदारांची आहेत. दक्षिण गोव्यातील 18679 मते आरजीला मिळाली नसती तर कदाचित भाजपला विजयही प्राप्त झाला असता. एवढेच नव्हे तर उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि माजी मंत्री व काँग्रेस नेते अॅड. रमाकांत खलप यांच्या विरोधात आरजीचे मनोज परब यांनी 44598 मते मिळविणे ही तशी सोपी गोष्ट नाही. भले सांतआंद्रेमध्ये या पक्षाचा आमदार असून देखील या मतदारसंघात भाजपने आघाडी मिळविली असली तरीदेखील आरजीने एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळविलेली मते, खुद्द विश्वजित राणे यांच्या वाळपई मतदारसंघात देखील 3.5 हजार मते मिळविली. याचा अर्थ सर्वच राजकीय पक्षांना गंभीरपणे त्याची दखल घ्यावी लागणार आहे.

काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसचा डंका

काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडून येऊन नंतर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांचा भाजपला कोणताही लाभ झाला नाही. उलटपक्षी त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचाच डंका दिसून आला. कुंभारजुवेमध्ये राजेश फळदेसाई, कळंगुटमध्ये मायकल लोबो, सांताक्रूझमध्ये ऊडॉल्फ फर्नांडिस, दक्षिण गोव्यात मडगावमध्ये दिगंबर कामत (भाजपला नाममात्र 86 मतांची आघाडी), नुवेमध्ये आलेक्स सिक्वेरा यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केलेला होता. याशिवाय कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या मतदारसंघात काँग्रेसने फार मोठी आघाडी मिळविली. प्रत्यक्षात या आमदारांचा भाजपला लोकसभा निवडणुकीत फारसा उपयोग झाला नाही.

Advertisement
Tags :

.