महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीपादभाऊंची उमेदवारीत डबल हॅट्ट्रिक

06:44 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपकडून उत्तर गोव्यासाठी उमेदवारीची घोषणा, दक्षिणेतील तिढा अद्याप कायम

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

भाजपतर्फे उत्तर गोव्यातून लोकसभेची उमेदवारी श्रीपाद नाईक यांनाच जाहीर झाली असून या उमेदवारीसंबंधी तमाम गोमंतकीयांच्या शिगेला पोहोचलेल्या उत्सुकतेस अखेर पूर्णविराम मिळाला. अशाप्रकारे श्रीपादभाऊंनी एकाच मतदारसंघात उमेदवारीची डबल  हॅट्ट्रिक साधली आहे. या उमेदवारीवर ते विजयी झाल्यास ती विजयाची हॅट्ट्रिक  ठरणार आहे. भाऊंच्या कार्यकर्तृत्वावर केंद्रीय नेतृत्वाने ठेवलेल्या विश्वासाचा हा विजय आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान, दक्षिण गोव्यातील उमेदवारीचा तिढा मात्र अद्याप कायम राहिला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात श्रीपाद नाईक यांच्या नावाचाही समावेश आहे. या 195 उमेदवारांच्या यादीत इतर मोठ्या नावांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शहा, राजनाथ सिंह आदोचा समावेश आहे. नावे जाहीर झालेल्यांपैकी 28 महिला, 47 युवा,  27 एसटी, 18 एससी आणि 57 ओबीसी उमेदवार आहेत.

अशाप्रकारे केंद्रीय नेतृत्वाने भाऊंच्या कार्यावर विश्वास दाखविलेला असला तरी दक्षिण गोव्यातील पेच अद्याप कायम राहिला आहे. पुढील दोन दिवसांत भाजपच्या संसदीय समितीकडून दक्षिणेतील उमेदवारीबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे.

श्रीपादभाऊ जरी विद्यमान खासदार असले तरीही त्यांच्याजागी नवा चेहरा असावा अशी स्थानिक भाजप नेतृत्वातीलच काहीजणांची अंतर्गत इच्छा होती. त्याशिवाय अन्य अनेकजण स्वत:ची फिल्डिंग लावण्यासाठी दिल्लीच्या वाऱ्याही करून आले होते. परंतु अखेरच्याक्षणी श्रीपादभाऊंचेच पारडे जड ठरले व शनिवारी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

दक्षिण गोवा सध्या काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ काबीज करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. मात्र त्यासाठी  ‘जिंकण्याची क्षमता’ असलेला तगडा उमेदवार त्यांना सापडलेला नाही. त्यामुळे सध्या चर्चेत असलेले दोन उमेदवार अर्थात माजी खासदार नरेंद्र सावईकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्यावरच त्यांची भिस्त आहे. त्यांच्या विजयासाठी भाजपला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. म्हणूनच गुऊवारी दिल्लीत दीर्घकाळ झालेल्या चर्चेनंतरही दक्षिण गोव्यातील उमेदवारीचा तिढा कायम राहिलेला आहे. आता तमाम गोमंतकीयांचे लक्ष दक्षिणेतील उमेदवाराच्या घोषणेकडे लागले असून लवकरच जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत ते नाव जाहीर होणार आहे.

नेतृत्वाचा विश्वास, जनतेचे आशीर्वाद, नशिबाची साथ : श्रीपादभाऊ

दरम्यान, उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्रीपाद नाईक यांनी, पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम केंद्रीय नेतृत्त्वाचे आभार मानले. आपणाला मिळालेली ही संधी म्हणजे उत्तर गोव्यातील जनतेचे आशीर्वाद आहेत.  गत पाच निवडणुकीत मतदारांनी केलेले सहकार्य आणि दाखविलल्या विश्वासामुळेच आपण हा टप्पा गाठू शकलो, असेही ते म्हणाले.

अशाप्रकारे जनतेने ठेवलेला विश्वास आणि केंद्रीय नेतृत्वाने दिलेला पाठिंबा व विश्वास सार्थ करण्याचे प्रयत्न करेन, असे त्यांनी सांगितले. जनतेने ठेवलेल्या विश्वासाची परतफेड विकासाच्या माध्यमातून आम्ही करतच आहोत, त्यामुळेच तब्बल पाचवेळा आम्हाला या लोकांची सेवा करण्याचे भाग्य लाभले, असे ते पुढे म्हणाले. याकामी नशिबाने आतापर्यंत साथ दिलीच आहे, यापुढेही ती तशीच मिळावी, अशी अपेक्षा नाईक यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article