For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीपादभाऊ, बाबु कवळेकर आघाडीवर

12:00 PM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीपादभाऊ  बाबु कवळेकर आघाडीवर
Advertisement

उत्तरेत दयानंद सोपट, तर दक्षिणेत अॅड.नरेंद्र सावईकरांचे नाव दुसऱ्या स्थानी : दोन दिवसांत उमेदवारी निश्चिती, जिंकण्यासाठी भाजची जोरदार तयारी

Advertisement

पणजी : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार तथा पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि माजी आमदार दयानंद सोपटे यांच्या नावाचा विचार भाजपने चालाविला आहे. त्याचबरोबर दिलीप परूळेकर आणि त्यानंतर दयानंद मांद्रेकर यांचे नावही दिल्लीत पाठविले आहे. दक्षिण गोव्यासाठी माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर आणि माजी उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर या दोन नावांचा प्रस्ताव भारतीय जनता पार्टीने नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. पुढील दोन दिवसांत गोव्यातील भाजपचे उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी करतानाच संभाव्य उमेदवारांची नावेही दिल्लीला पाठविली आहेत. विद्यमान खासदार श्रीपाद नाईक जे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री आहेत, त्यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या पाठोपाठ दुसरे नाव दयानंद सोपटे यांचे घेण्यात आले आहे. श्रीपाद नाईक यांच्या कार्यपद्धतीवर मतदारसंघातील वाढती नाराजी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात जाणवली आहे. त्यानंतर दयानंद सोपटे यांच्या नावाचाही गांभिर्याने विचार करण्यात आला. पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्याच्या बाबतीत दिल्लीत चर्चा होईल आणि अंतिम निर्णय घेण्यात येईल. मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजप अध्यक्षांना दिल्लीतील बैठकीस बोलाविण्यात येणार आहे. दक्षिण गोव्यात माजी उपमुख्यमंत्री बाबु कवळेकर यांनी जोर धरलेला आहे. त्यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. पाठोपाठ अॅड. नरेंद्र सावईकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला आहे, तर तिसरे नाव म्हणून दामू नाईक यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपने पक्षश्रेष्ठींकडे पाठविला आहे. दक्षिण गोव्यात आपने काँग्रेसला पाठिंबा दिल्यामुळे काँग्रेसचे बळ सालसेतमध्ये दोन मतदारसंघातून वाढणार असे दिसत असल्याने भाजपने आपल्या धोरणात योग्य बदल करण्याचा निर्णय घेतला. बाबु कवळेकर हे केपेमध्ये 5 वेळा विजयी झालेले आहेत. त्यांचा काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच भाजप व मगो कार्यकर्त्यांबरोबरही चांगले संबंध असल्याने ते काँग्रेसची मतेही खेचून आणतील आणि भाजपची सारी मते त्यांना मिळतील, असा अंदाज बांधून भाजपने त्यांचे नाव आघाडीवर घेतल्याचे वृत्त आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.