श्रीमारुतीराय अष्टसिद्धीचे दाता आहेत
अध्याय सातवा
अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व, वशित्वं या आठ सिद्धी आहेत. सिद्धी या शब्दाचा अर्थ आहे- पूर्णता, प्राप्ति, सफलता इ. असामान्य कौशल्य, असामान्य क्षमता अर्जित करण्यास सिद्धी असे म्हटले गेले आहे. उदाहरणादाखल पहावयाचे झाल्यास दिव्यदृष्टी, एकाच वेळेस दोन जागी असणे, आपल्या आकारास सूक्ष्म अथवा मोठे करणे इ. पातंजल योगशास्त्रात-जन्माने, औषधिद्वारा, मंत्राद्वारा, तपाने आणि समाधीने सिद्धींची प्राप्ती केली जाते असे म्हटले आहे. मुख्य सिद्धी आठ प्रकारच्या आहेत. त्या अशा...
अणिमा-ज्यामुळे साधक अणूइतका सूक्ष्म होऊन कुणासही दृष्टीस पडत नाही. त्यामुळे मनुष्य कठिणातल्या कठीण पदार्थातही प्रवेश करू शकतो.
महिमा-या सिद्धीमुळे साधक आपल्या शरीरास अमर्याद विशालकाय करण्यास समर्थ असतो. हनुमंतांच्या अनेक लिलात त्यांनी या सिद्धीचा वापर केलेला आहे. गरिमा-शरीरास वजनदार, भारी बनविण्याची क्षमता म्हणजेच गरिमा सिद्धी. आपण महाभारतात सत्यभामेच्या गर्वहरण करण्याचा प्रसंग वाचतो की, श्रीकृष्णाची तुला करताना सर्व मौल्यवान वस्तू दुसऱ्या पारड्यात टाकल्या तरीही श्रीकृष्णाचंच पारडं जड राहतं. कारण त्यांच्या शरीराचा आकार न बदलता त्यांनी शरीराला वजनदार केलं होतं. लघिमा-या सिद्धीच्या योगे कापसाप्रमाणे शरीर हलके करता येते. शरीरात अत्यंत हलकेपणा आल्यामुळे सहज आकाशात उडता येते. श्रीगोंदवलेकर महाराज या सिद्धीचा वापर करून त्यांचं शरीर एव्हढं हलकं करत की, त्यांची पालखी त्यांचे छोटे भक्त सहजी उचलू शकत.
प्राप्ती-प्राप्ती म्हणजे इंद्रियाच्या अधिष्टीत देवतांची प्राप्ती. माणसाच्या दहाही इंद्रियांच्या देवता आहेत. त्यांना प्रसन्न करून घेणं म्हणजे त्यांची प्राप्ती करून घेणं असं म्हणता येईल. असं झालं की, साधकाच्या शरीराच्या हालचाली त्याला अनुकूल अशा होत राहतात. प्राकाश्य-या सिद्धीमुळे अदृश्य वस्तूचे दर्शन होते. सामान्यत: वस्तूवर प्रकाश पडला की, वस्तू दिसू लागते. म्हणून अंधारात असलेल्या वस्तू आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत पण ज्याला प्राकाश्य सिद्धी प्राप्त असेल त्याला अंधारातील वस्तू स्पष्ट दिसू लागते.
ईशिता-या सिद्धीमुळे नैसर्गिक शक्तीवर प्रभुत्व मिळवता येते. साधकाच्या साधनेच्या आड जर नैसर्गिक शक्ती येत असतील तर तो ईशिता सिद्धीमुळे त्यावर प्रभुत्व मिळवू शकतो. कित्येक साधू, मुनी ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता, प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत सातत्याने तपश्चर्या करत असतात. कारण ईशीता सिद्धीच्या सहाय्याने ते निसर्गावर मात करतात.
वशीता-या सिद्धीमुळे साधक विषयाबाबत वाटणाऱ्या आसक्तीवर विजय मिळवतो. त्यामुळे जीवनात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांमुळे त्याला सुख वा दु:ख वाटत नाही. प्रत्येक माणसाच्या जीवनात अशा घटना घडत असतात आणि त्यांच्या परिणामादाखल तो सुखी किंवा दु:खी होत असतो पण साधक संपूर्ण निरपेक्ष असतो. अशा प्रसंगात तो स्थिर रहावा म्हणून ईश्वराने त्याला सिद्धी बहाल केलेल्या असतात आणि त्या त्याच्या साधनेच्या आड येणाऱ्या गोष्टींपासून त्याचं संरक्षण करतात.
अशा या प्रमुख आठ सिद्धी असून श्री मारुतीरायांनी त्यांना प्राप्त असलेल्या सिद्धी वापरून सीतेला शोधण्याच्या कार्यात श्रीरामाला मदत केली. म्हणून सीतामाईंनी मारुतीरायांना अष्टसिद्धी प्रदान करायचा अधिकार दिलेला आहे. म्हणून मारुतीरायांचा अष्टसिद्धी के दाता असा गौरवपूर्ण उल्लेख तुलसीरामायणात केलेला आहे.