श्रीकांत, वलीशेट्टी उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था / आँटेरियो (कॅनडा)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या 2025 च्या कॅनडा खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांत, एस. वलीशेट्टी आणि एस. शंकर मुथुस्वामी सुब्रमणियन या तीन बॅडमिंटनपटूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
पुरुष एकेरीच्या खेळविण्यात आलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या किदांबी श्रीकांतने चीन तैपेईच्या वेंग वेइचा 21-19, 21-14 अशा सरळ गेम्समध्ये 41 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. गेल्या मे महिन्यात झालेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांतने उपविजेतेपद पटकाविले होते. आता किदांबी श्रीकांतचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना चीन तैपेईच्या टॉपसिडेड चोयु चेनबरोबर होणार आहे. दुसऱ्या एका सामन्यात भारताच्या शंकर सुब्रमणियनने चीन तैपेईच्या हुआंग केईचा 21-19, 21-14 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचा पुढील सामना जपानच्या निशीमोटोशी होणार आहे. महिला एकेरीमध्ये भारताच्या श्रीयांशी वलीशेट्टीने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना मलेशियाच्या के. लिसेनावर 21-15, 21-14 अशा गेम्समध्ये मात केली. हा सामना 35 मिनिटे चालला होता. वलीशेट्टीचा उपांत्यपूर्व फेरीचासामना डेन्मार्कच्या अॅमेली स्कूझशी होणार आहे. मिश्र दुहेरीत भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रेस्टो यांचे आव्हान स्पेनच्या गार्सीया आणि रॉड्रिग्ज यांनी संपुष्टात आणले.