श्री श्री रविशंकरही गोव्याबाबत म्हणाले ‘इनफ इज इनफ’!
न्या. फेर्दिन रिबेलो यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा
पणजी : न्यायमूर्ती फेर्दिनो रिबेलो यांनी आरंभलेल्या ‘इनफ इज इनफ’जनआंदोलनाचे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनीही समर्थन केले असून पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.काल रविवारी मुंबईत ‘मेडिकल कन्सल्टंटस् संघटना आणि त्यांचा महासंघ’ यांनी संयुक्तरित्या ‘ऍमकॉन फॅमिकॉन’ नामक दिवसभराच्या अधिवेशनाचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून गुऊदेव रविशंकर आणि खास सन्माननीय पाहुणे न्यायमूर्ती रिबेलो हे उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यानंतर गुऊदेव रविशंकर यांच्याशी बोलताना न्यायमूर्ती रिबेलो यांनी गोव्यात चालू झालेला पर्यावरणीय ऱ्हास, जमिनींची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या होणारी ऊपांतरणे, बेफाम डोंगर कापणी व जलमय भूभागांची अमर्याद हानी, यासारख्या विविध मुद्यांवर त्यांना माहिती दिली. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गुऊदेवांनी गोव्याची भूमी आणि भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच या जनआंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा राहील, असे ठाम आश्वासनही न्यायमूर्ती रिबेलो यांना दिले.