एस. आर.आय भात लागवडीची उपप्रकल्प संचालकांकडून पाहणी
नेमळे सातेरी महिला शेतकरी गटाचे कौतुक
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील श्री देवी सातेरी महिला शेतकरी गटातील शेतकऱ्यांकडून केलेल्या एस. आर. आय भात लागवडीची कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे उपप्रकल्प संचालक प्रगती तावरे यांनी भेट देऊन पाहणी केली . यावेळी सातेरी महिला गटाच्या अध्यक्ष रुक्मिणी राऊळ ,उपाध्यक्ष दिव्या राऊळ ,सचिव अनुष्का राऊळ यांनी प्रगती तावरे यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. यावेळी नेमळे सातेरी शेतकरी गटाच्या सर्व महिला , कृषी अधिकारी यशवंत गव्हाणे,सावंतवाडी मंडळ अधिकारी श्री पाटील ,मिनल परब, सावंतवाडी मंडळ अधिकारी पाटील,कृषी सहाय्यक निखिल जाधव तसेच इतर शेतकरी उपस्थित होते. यावेळी तावरे यांनी नेमळे सातेरी महिला शेतकऱी गटाचे त्यांनी कौतुक केले . गेल्या वर्षी भात पिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या शेतकऱ्यांचेही तावरे यांनी अभिनंदन केले.अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी अधिकाऱ्याच्या सल्ल्यानुसार शेती केल्यास थोडक्या शेतीत जास्त उत्पन्न मिळून जाईल असे मार्गदर्शन केले.यावेळी कृषी अधिकारी गव्हाणे व सावंतवाडी मंडळ अधिकारी पाटील यांनीही शेतकऱ्यांना एस आर आय लागवड, नारळवरील कीड रोग, आणि उपाय याविषयी माहिती दिली. तसेच कोनोविडर (कोळपणी)यंत्राचे वाटप करण्यात आले तसेच या यंत्राचे महत्व आणि त्याचा वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक करून दाखविले. एसआरआय भात पिक प्रात्यक्षिक घेतेवेळी बीज प्रक्रिया व इतर अनुषंगिक सर्व माहिती तसेच नेमळे गावात एकूण 340 हेक्टर क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांनी भात लागवड, केली आहे असे कृषी सहाय्यक निखिल जाधव यांनी सांगितले.गटातील सचिव अनुष्का राऊळ यांनी अन्न सुरक्षा गट अंतर्गत भाजीपाला बियाणे लागवड विषयी माहिती तसेच मागील वर्षी एस आर आय भात पिक लागवड आणि त्यापासून झालेला लाभ याविषयी स्वतः चे अनुभव सांगितले यानंतर आंबा अतिघन लागवड व लिली लागवड प्रक्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली.