आज राज्यात श्रीरामनवमी आनंदपर्व
पणजी : आदर्श राजा, एक वचनी, एक पत्नी असे ज्याचे वर्णन केले जाते त्या प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव म्हणजेच श्रीराम नवमी उत्सव आज गोव्यात सर्वत्र उत्साहात व थाटात साजरा केला जाणार आहे. गोव्यात आज सर्व ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा केला जात असून त्यानिमित्त राम मंदिरे तसेच हनुमान मंदिर आणि साई मंदिरामध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गोव्यात अनेक ठिकाणी राम मंदिरे आहेत याशिवाय इतर मंदिरामध्ये देखील श्री रामाची मूर्ती बसविण्यात आली असून त्या ठिकाणी आज रामनवमी उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जाणार आहे
कोलवाळ, गिमोणे पिळगाव, डिचोली, साखळी, खडकी, भाटले, पणजी, रायबंदर, याशिवाय अनेक ठिकाणी असलेली राम मंदिरे, राज्यात अनेक ठिकाणी असलेल्या हनुमान मंदिरामध्ये देखील राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा केला जाणार आहे. आज दुपारी 12:30 वाजता रामजन्मोत्सव साजरा होईल. त्याचबरोबर आरत्या, महाप्रसाद, भजन, कीर्तन, नाटक असे असंख्य कार्यक्रम होणार आहेत. पर्तगाळ, काणकोण येथेही राम मंदिरामध्ये आज भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान राज्य सरकारने आज सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.