For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीलंकेचे वर्ल्डकपमधून पॅकअप, न्यूझीलंडचा 61 धावांनी विजय

06:55 AM Feb 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीलंकेचे वर्ल्डकपमधून पॅकअप  न्यूझीलंडचा 61 धावांनी विजय
Advertisement

सामनावीर रचिन रवींद्रची भन्नाट खेळी : न्यूझीलंडच्या विजयाने पाकची वाट मात्र बिकट

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील लढतीत न्यूझीलंडने यजमान श्रीलंकेला 61 धावांनी पराभूत केले आहे. या पराभवासह श्रीलंकेचा यंदाच्या स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 20 षटकांत 7 गडी गमावून 168 धावा केल्या. प्रत्युत्तरात, श्रीलंकेला 8 गडी गमावून फक्त 107 धावा करता आल्या. या विजयासह न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले आहे.

Advertisement

श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय श्रीलंकेला महागात पडल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातील किवीज संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फिन अॅलन 8 धावा करुन बाद झाला. यानंतर फिन अॅलनने 23, रचिन रविंद्रने 32 तर ग्लेन फिलिप्सने 18 धावा केल्या. हे स्टार फलंदाज झटपट बाद झाल्याने न्यूझीलंडची 84 धावांवर 6 विकेट अशी बिकट स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडचा कॅप्टन मिशेल सँटनर आणि कोल मॅककॉन्ची या दोघांनी केलेल्या भागीदारीमुळं त्यांनी 20 ओव्हरमध्ये 7 बाद 168 केल्या. शेवटच्या काही षटकांत सँटनरने सर्वाधिक 26 चेंडूत 47 तर कोलने 23 चेंडूत 31 धावा केल्या.

लंकन संघ स्पर्धेबाहेर

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेले आव्हान पार करण्यात लंकन संघ अपयशी ठरला. श्रीलंकेची टॉप ऑर्डर, मधल्या फळीतील फलंदाज फार चांगली कामगिरी करु शकले नाहीत. पथुम निसांका खाते देखील उघडू शकला नाही. कुशल मेंडिस 11, चरीथ असलंका 5,  पवन रत्नायके 10, दसून शनाका 3 धावांवर बाद झाला. दुनिथ वेलालगेने (29) श्रीलंकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. याशिवाय, कमिंदू मेंडिसने सर्वाधिक 31 धावा केल्या. परिणामी ‘करो वा मरो‘च्या लढतीत लंकेचा संघ निर्धारित 20 षटकात 8 विकेट्सच्या मोबदल्यात 107 धावांपर्यतच मजल मारू शकला. न्यूझीलंडने 61 धावांनी सामना जिंकत सेमीची आपली दावेदारी भक्कम केली आहे. रचिन रवीद्रने 27 धावांत 4 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 168 (फिन अॅलन 23, रचिन रवींद्र 32, ग्लेन फिलिप्स 18, सँटनर 47, कोल 31, महेश तिक्षणा आणि दुष्मंता चमीरा प्रत्येकी 3 बळी)

श्रीलंका 20 षटकांत 8 बाद 107 (कुसल मेंडिस 11, कमिंदू मेंडिस 31, वेलालगे 29, रवींद्र 4 बळी, मॅट हेन्री 2 बळी).

 ग्रुप -2 मध्ये रंगतदार स्थिती

सुपर 8 च्या ग्रुप 2 मध्ये इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. यापैकी इंग्लंडने दोन सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. आता श्रीलंकेचा संघ दोन पराभवांमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. आता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एक संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. न्यूझीलंडचे 3 गुण झाले आहेत. पाकिस्तानकडे 1 गुण आहे. दोन्ही संघांचे एक-एक सामने बाकी आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात एक सामना बाकी आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकल्यास पाकिस्तान बाहेर जाईल. तर, पाकिस्तानचा विचार केल्यास त्यांना श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. दुसरीकडे इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करावे लागेल. तर, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात नेट रनरेट चांगला असणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.

Advertisement
Tags :

.