वनडे मालिकेत लंकेची विजयी सलामी
बांगलादेशचा 77 धावांनी पराभव, असालेंका ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/कोलंबो
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत यजमान लंकेने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 77 धावांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात 123 चेंडूत 106 धावा (शतक) झळकविणाऱ्या चरिथ असालेंकाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यामध्ये बांगलादेशची ऐतिहासिक घसरगुंडी पहावयास मिळाली. बांगलादेशचे 7 गडी केवळ 5 धावांच्या मोबदल्यात तंबूत परतले. या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांचा डाव 49.2 षटकात 244 धावांत आटोपला. त्यानंतर बांगलादेशला 35.5 षटकात 167 धावांपर्यंत मजल मारता आल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लंकेच्या डावामध्ये कर्णधार चरिथ असालेंकाने 123 चेंडूत 4 षटकार आणि 6 चौकारांसह 106 धावा झळकविल्या.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका 49.2 षटकात सर्वबाद 244 (असालेंका 106, कुशल मेंडीस 45, लियानगे 29, मिलन रत्नायके 22, हसरंगा 22, टी. अहमद 4-47, टी. इस्लाम आणि नजमुल हुसेन शांतो प्रत्येकी 1 बळी, शकीब 45-3), बांगलादेश 35.5 षटकात सर्वबाद 167 (टी. हसन 62, जाकेर अली 51, शांतो 23, परवेज हुसेन इमॉन 13, हसरंगा 4-10, असिता फर्नांडो व तिक्ष्णा प्रत्येकी 1 बळी, कुशल मेंडीस 3-19)