टी-20 वर्ल्ड कपसाठी लंकेचा अंतिम संघ जाहीर
वृत्तसंस्था/ कोलंबो, लंका
गेल्या डिसेंबरमध्ये प्राथमिक संघ जाहीर केल्यानंतर लंकेने टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला अंतिम संघ जाहीर केला असून अष्टपैलू दसुन शनाका या संघाचे नेतृत्व करणार आहे तर पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, चरिथ असालंका या प्रमुख खेळाडूंचा या संघात समावेश आहे.
फलंदाज कमिंदू मेंडिसलाही वेगवान गोलंदाज इशान मलिंगा याच्यासह संघात स्थान मिळाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यावेळी मलिंगाच्या खांद्याला दुखापत झाली होती. मेंडिसला धनंजय डिसिल्वाच्या जागी घेण्यात आले असून इंग्लंड व पाकविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकांमध्ये त्याला संघर्ष करावा लागला होता. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला निसांका व उदयोन्मुख कामिल मिशारा हे लंकेच्या फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ ठरणार असून त्यांच्या कामगिरीवर लंकेचे स्पर्धेतील यश अवलंबून राहील. कुसल व चरिथ हे अनुभवी असल्याने स्थैर्य देण्यासाठी तेही उपयोगी ठरणार आहेत.
लंकेने 2014 मध्ये टी-20 विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यावेळी अंतिम फेरीत त्यांनी भारताला हरविले होते. वर्ल्ड कपमध्ये लंकेचे सामने आयर्लंडविरुद्ध 8 फेब्रुवारी, ओमानविरुद्ध 12 फेब्रुवारी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 फेब्रुवारी, झिम्बाब्वेविरुद्ध 19 फेब्रुवारी रोजी होणार आहेत.
टी-20 विश्वचषकासाठी लंका संघ : दसुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कामिल मिशारा, कुसल मेंडिस, कमिंदू मेंडिस, कुसल परेरा, चरिथ असालंका, जनिथ लियानगे, पवन रत्नायके, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलालगे, महीश थीक्षाना, दुश्मंता चमीरा, मथीशा पथिराना, इशान मलिंगा.