For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरच्या मैदानावर श्रीलंकेचे पतन

06:56 AM Feb 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
घरच्या मैदानावर श्रीलंकेचे पतन
Advertisement

इंग्लंडचा 51 धावांनी दणदणीत विजय : सामनावीर विल जॅक्सची अष्टपैलू खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

पल्लेकलच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर अनाकलनीय फटक्यांद्वारे श्रीलंकन फलंदाजांनी फाजीलपणा केला. हा फाजीलपणा एकूणच महागात पडला आणि यजमानांना अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला. रविवारी झालेल्या सुपर-8 मधील सामन्यात इंग्लंडने श्रीलंकेला 51 धावांनी पराभूत करत दोन गुणाची कमाई केली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 9 बाद 146 धावा केल्या, तर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 95 धावांत ऑलआऊट झाला.

Advertisement

प्रारंभी, श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा नूर ओळखत श्रीलंकेच्या दुनिथ वेल्लागे, महेश तीक्षणा या फिरकीपटूंनी इंग्लंडच्या फलंदाजां भोवती फास आवळला. अनुभवी जोस बटलरला सूर गवसला नाही. तो 7 धावा करून तंबूत परतला. जेकब बेथेलचा चेंडू न पाहता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलट आला. 3 धावा करून तोही माघारी परतला. चोरटी धाव घेण्याचा टॉम बॅन्टनचा (6) प्रयत्न फसला. वेल्लागेने इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकला (14) पायचीत पकडले. याशिवाय, सॅम करनही सपशेल अपयशी ठरला. एका बाजूने सातत्याने विकेट्स पडून सहकारी बाद होत असतानाही फिल सॉल्टने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. सॉल्टच्या या महत्वपूर्ण खेळीमुळे इंग्लंडला 146 धावापर्यंत मजल मारता आली. विल जॅक्सने 21 धावांचे योगदान दिले. जेमी ओव्हर्टनने 10 धावा केल्या.

श्रीलंकन फलंदाजांची सपशेल निराशा

कँडीतील पल्लेकलच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सहज बाजी मारेल, असे वाटत होते. पण तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरने फॉर्ममध्ये असलेल्या पथुम निसंकाला अवघ्या 9 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर चौथ्या षटकांत पुसल मेंडिस आणि पवन रथनायके हे दोघेही लागोपाठ बाद झाले.  पॉवरप्लमध्ये विल जॅक्सने तीन विकेट्स घेतल्या तर जोफ्राने दोन विकेट्स घेत श्रीलंकेची अवस्था 5 बाद 34 अशी बिकट केली. श्रीलंकेच्या फलंदाजांनी खराब शॉर्ट सिलेक्शन करताना स्वत:चा घात करून घेतला. कर्णधार शनाका व कमिंदू मेंडिस ही जोडी श्रीलंकेला सावरण्याचा प्रयत्न करत होती, परंतु त्यांना यश आले नाही. मेंडिस 13 धावांवर बाद झाला. कर्णधार दासून शनाका याच्याकडून अपेक्षा होत्या आणि त्याने 30 धावांची खेळी करून इंग्लंडला दडपणाखाली ठेवले होते. पण तो बाद झाला अन् लंकेच्या उरल्या सुरल्याही अपेक्षा संपुष्टात आल्या. श्रीलंकन संघ 16.4 षटकांत 95 धावांत ऑलआऊट झाला.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड 20 षटकांत 9 बाद 146 (फिल सॉल्ट 62, हॅरी ब्रूक 14, सॅम करन 11, विल जॅक्स 21, वेल्लागे 3 बळी, महेश तीक्षणा आणि मधुशनाका प्रत्येकी 2 बळी)

श्रीलंका 16.4 षटकांत सर्वबाद 95 (वेल्लागे 10, कामिंदू मेंडिस 13, दसुन शनाका 30, महेश तिक्षणा नाबाद 10, विल जॅक्स 3 बळी, जोफ्रा आर्चर, डॉसन आदिल रशीद प्रत्येकी 2 बळी)

इंग्लंड वरचढ, पाक, लंका, न्यूझीलंडमध्ये चुरस

इंग्लंडने लंकेवरील विजयासह सुपर 8 मधील ग्रुप 2 मध्ये 2 गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे. न्यूझीलंड व पाकिस्तान यांचा सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि त्यामुळे दोघांना प्रत्येकी 1 गुण दिला गेला आहे. आता इंग्लंडचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध होणार आहे आणि यात विजय मिळवून ते उपांत्य फेरीतील जागा पक्की करण्याच्या दिशेने आगेकूच करतील. पाकला उपांत्य फेरीत गाठायची असेल तर उर्वरित दोन्ही (वि. इंग्लंड आणि वि. श्रीलंका) सामन्यांत विजय मिळवावे लागणार आहेत. न्यूझीलंडच्या बाबतीतही (वि. श्रीलंका व वि. इंग्लंड) हेच समीकरण असेल. श्रीलंका उर्वरित दोन सामने (वि. न्यूझीलंड व वि. पाकिस्तान) जिंकून 4 गुणांपर्यंत पोहोचतील. अशा परिस्थितीत नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावेल.

Advertisement
Tags :

.