यू-19वर्ल्ड कपसाठी लंकन युवा क्रिकेट संघ जाहीर
वृत्तसंस्था / कोलंबो
15 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील विश्व युवा चषक पुरूषांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा लंकन युवा संघ जाहीर करण्यात आला. या संघाचे नेतृत्व विमथ दिनसाराकडे सोपविण्यात आले असून कविजा गामागे उपकर्णधार राहील.
या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या लंकन युवा संघामध्ये कर्णधार दिनसारा, गामागे, महाविथना हे प्रमुख फलंदाज असून विरान चमुदीता, चमिका हीन्तीगाला आणि गामागे हे अष्टपैलू खेळाडू आहेत. सदर स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबीया यांच्या संयुक्त यजमानपदाने खेळविली जाणार आहे. लंकेचा सलामीचा सामना 17 जानेवारीला जपानबरोबर होणार आहे. या स्पर्धेत लंकन संघांचा अ गटात समावेश असून विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि जपान यांचाही सहभाग आहे. सदर स्पर्धेत 16 संघांचा समावेश असून टांझानिया संघ प्रथमच या स्पर्धेत पात्र ठरला आहे. ही स्पर्धा 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान खेळविली जाईल.
या स्पर्धेत सहभागी झालेले 16 संघ चार गटात विभागले गेले आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण 41 सामने 23 दिवसांत खेळविले जातील. 2024 साली झालेल्या या स्पर्धेत विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाचा या स्पर्धेतील सलामीचा सामना आयर्लंडबरोबर 16 जानेवारीला होणार आहे. तर भारतीय युवा संघांचापहिला सामना 15 जानेवारीला झिम्बाब्वेतील बुलावायो येथे अमेरिकाबरोबर होणार आहे. भारताचे या स्पर्धेतील पुढील सामने बांगलादेशबरोबर 17 जानेवारीला, न्यूझीलंडबरोबर 24 जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारताने आतापर्यंत पाचवेळा अजिंक्यपद पटकाविले आहे. 2000 साली मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली, 2008 साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2018 साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली, 2020 साली पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि 2022 मध्येही यश धूलच्या नेतृत्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती.
लंका युवा संघ: विमाथ दिनसारा (कर्णधार), कवीजा गामगे (उपकर्णधार), दिमंता महाविथना, विरान चमुदिता, दुलनित सिगेरा, चमिका हीन्तीगाला, अॅडम हिलमी, चमरिंदु नेतसारा, सेथमिका सेनेवीरत्ने, कुगाथस मथुलान, रसित निमसारा, विघ्नेश्वरन आकाश, जीवंता श्रीराम, सेनुजा वेकुनागोडा, मलिंथा सिल्वा.