लंकन महिला संघाचा विंडीजवर विजय
टी-20 मालिका, चमारी अट्टापटू ‘सामनावीर’
वृत्तसंस्था, सेंटजॉर्ज
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात कर्णधार चमारी अट्टापटूच्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर श्रीलंका महिला संघाने यजमान विंडीज संघाचा 11 चेंडू बाकी ठेवून चार गड्यांनी पराभव केला. या मालिकेत लंकेने विंडीजवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे.
या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजचा डाव 20 षटकांत 101 धावांत आटोपला. त्यानंतर लंकेने 18.1 षटकांत 6 बाद 102 धावा जमविमत विजय नोंदविला.विंडीजच्या डावात कर्णधार हेली मॅथ्युजने 36 चेंडूत 2 चौकारांसह 28, स्टीफेनी टेलरने 24 चेंडूत 14, डॉटीनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 12 तर अॅलेनीने 9 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. लंकेच्या शिस्तबद्ध आणि अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचे फलंदाज अधिक धावा जमवू शकले नाहीत. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 25 धावा जमविताना 2 गडी गमविले. विंडीजेचे अर्धशतक 68 चेंडूत तर शतक 119 चेंडूत नोंदविले गेले. लंकेतर्फे निलाक्षिका सिल्वा आणि मलिका मदारा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. अट्टापटूने 13 धावांत 2 बळी मिळविले. दिलहारीने 16 धावांत 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये कर्णधार अट्टापटूने 26 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 39 धावा जमविताना हसीनी परेरा समवेत सलामीच्या गड्यासाठी 45 चेंडूत 62 धावांची भागिदारी केली. यानंतर मात्र लंकेचे फलंदाज लवकर बाद झाले. लंकेने यानंतर आपले 5 फलंदाज 29 धावांत गमविले. गुणरत्नेने 11 चेंडूत 1 चौकारांसह 10 धावा केल्या. कविशा दिलहारीने 13 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 18 धावा जमवित आपल्या संघाला 11 चेंडू बाकी ठेवून 4 गड्यांनी विजय मिळवून दिला.लंकेच्या डावामध्ये 1 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 45 धावा जमविल्या. लंकेचे अर्धशतक 39 चेंडूत तर शतक 104 चेंडूत नोंदविले गेले.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकांत सर्वबाद 101 (मॅथ्युज 28, टेलर 14, डॉटीन 12, अॅलेनी नाबाद 11, निलाक्षीका सिल्वा आणि मदारा प्रत्येकी 3 बळी, अट्टापटू 2-13, दिलहारी 1-16), लंका 18.1 षटकांत 6 बाद 102 (अट्टापटू 39, हसिनी परेरा 18, गुणरत्ने 10, दिलहारी नाबाद 18, अवांतर 7, फ्लेचर आणि जोसेफ प्रत्येकी 2 बळी, मॅथ्युज व रेमहॅरेक प्रत्येकी 1 बळी).