लंकन महिला संघाकडून बांगलादेशचा व्हाईटवॉश
लंकेची चमारी अट्टापटू मालिकावीर आणि सामनावीर
वृत्तसंस्था, सिलेत
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकन महिला क्रिकेट संघाने यजमान बांगलादेशचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.या मालिकेतील शनिवारी येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात लंकेने बांगलादेशचा 3 धावांनी पराभव केला. लंकेची कर्णधार चमारी अट्टापटूला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी पुरस्कार मिळाला. या मालिकेत लंकेच्या महिला संघाने सर्वच विभागात आपल्या कामगिरीत सातत्य राखत बांगलादेशचा एकतर्फी पराभव केला.
या शेवटच्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.पावसाचा अडथळा आल्याने या सामन्यातील बराच कालावधी वाया गेल्याने पाऊस थांबल्यानंतर पंचांनी मैदान आणि खेळपट्टीची पाहणी करत हा सामना प्रत्येकी 9 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला.
बांगलादेशने 9 षटकांत 6 बाद 84 धावा जमविल्या. त्यानंतर लेकेने 9 षटकांत 6 बाद 87 धावा जमवित हा सामना केवळ तीन धावांनी जिंकला. बांगलादेशच्या डावामध्ये केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. शोभना मोसेट्रीने 15 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21, ज्युरीया फिर्दोसने 11 चेंडूत 2 चौकारांसह 15, कर्णधार निगर सुलतानाने 9 चेंडूत 1 षटकारासह 13 धावा जमविल्या. दिलारा अख्तरने 2 चौकारांसह 9, सुलताना खातुनने 4 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 9 धावा जमविल्या. बांगलादेशच्या 2 षटकार आणि 6 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 3 षटकांत 40 धावा जमविल्या. लंकेतर्फे सुगंधीका कुमारी आणि चमारी अट्टापटू यांनी प्रत्येकी 2 तर निमाशा मिपागे आणि मिथाली अयोध्या यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावामध्ये सलामीच्या चमारी अट्टापटूने 27 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 41 धावा जमविताना इमिशा दुलानीसमवेत सलामीच्या गड्यासाठी 21 चेंडूत 43 धावांची भागिदारी केली. दुलानीने 10 चेंडूत 4 चौकारांसह 19 धावा केल्या. समरविक्रमा 3, करुणारत्ने 2, निलाक्षीकासिल्वा 1 धावावर बाद झाली. कविशा दिलहारीने 7 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 2 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. लंकन संघाने पॉवरप्ले दरम्यानच्या 3 षटकांत 26 धावा जमविताना 1 गडी गमविला. बांगलादेशतर्फे सुलताना खातुनने 8 धावांत 3 तर सजिदा अख्तर मेघलाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक: (पावसामुळे हा सामना प्रत्येकी 9 षटकांचा खेळविला गेला. ) बांगलादेश 9 षटकांत 6 बाद 84 (शोभना मोसेट्री 21, फिरदोस 15, निगर सुलताना 13, दिलहारा अख्तर 9, सुलताना खातुन नाबाद 9, अवांतर 9, चमारी अट्टापटू व सुगंधीका कुमारी प्रत्येकी 2 बळी, मिपागे आणि अयोध्या प्रत्येकी 1 बळी), लंका 9 षटकांत 6 बाद 87 (चमारी अट्टापटू 41, दुलानी 19, कविशा दिलहारी 15, अवांतर 6, सुलताना खातुन 3-8, अख्तर मेगला 1-16).