लंकन महिला संघाचा पाकवर विजय
वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी, विश्मी गुणरत्ने सामनावीर
वृत्तसंस्था, हंबनटोटा
श्रीलंकेत सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात यजमान लंकन महिला संघाने पाकचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात दमदार शतक झळकविणाऱ्या लंकेच्या विश्मी गुणरत्नेला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. लंकेतर्फे समरविक्रमाने नाबाद 100 शतक झळकविले तर पाकच्या सिद्रा अमिनचे नाबाद शतक वाया गेले.
या दुसऱ्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 50 षटकांत 5 बाद 273 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 46.5 षटकांत 2 बाद 275 धावा जमवित हा सामना 8 गड्यांनी जिंकला. या सामन्यात लंकेतर्फे सलामीच्या गुणरत्नेने 123 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 123 धावा तर हर्शिता समरविक्रमाने 119 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 100 धावा झोडपल्या. पाकच्या डावामध्ये सिद्रा अमिनचे नाबाद शतक मात्र वाया गेले.
पाकच्या डावामध्ये सिद्रा अमिनने 120 चेंडूत 13 चौकारांसह नाबाद 100 धावा झळकविल्या. आयेशा जाफरने 45 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 49, मुनीबाअलीने 62 चेंडूत 4 चौकारांसह 45, कर्णधार फातिमा सनाने 18 चेंडूत 4 चौकारांसह 25 धावा आणि अल्वीने 1 चौकारांसह नाबाद 8 धावा केल्या. गुल फिरोजाने 33 चेंडूत 4 चौकारांसह 27 तर सदाफ शमसने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. आयेशा जाफर आणि सिद्रा अमिन यांनी तिसऱ्या गड्यासाठी 78 धावांची भागिदारी केली. जाफर बाद झाल्यानंतर सिद्रा अमिन समवेत मुनीबा अलीने चौथ्या गड्यासाठी 88 धावांची भागिदारी केल्याने पाकला 273 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकच्या डावामध्ये 2 षटकार आणि 33 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे चमारी अटापटू, चेतना विमुक्ती, रणवीरा आणि कवीशा दिलहारी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात सलामीची फलंदाज चमारी अटापटू पाचव्या षटकांत केवळ एकाधावेवर झेलबाद झाल्यानंतर विश्मी गुणरत्ने आणि हर्शिता समरविक्रमा यांनी पाकच्या गोलंदाजांना शेवटपर्यंत वरचढ होऊ दिले नाही. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 35.1 षटकांत 203 धावांची द्विशतकी भागिदारी केली. संघाला विजयासाठी 50 धावांची जरूरी असताना गुणरत्ने यष्टीचीत झाली. तिने 123 चेंडूत 1 षटकार आणि 11 चौकारांसह 123 धावा झळकविल्या. गुणरत्ने बाद झाल्यानंतर समरविक्रमा आणि दिलहारी यांनी विजयाचे सोपस्कार 19 चेंडू बाकी ठेवून पूर्ण केले. समरविक्रमाने 119 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 100 तर दिलहारीने 33 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 40 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे फातिमा सना आणि संधू यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या सामन्यात लंकेला 2 गुण मिळाले.
संक्षिप्त धावफलक: पाक 50 षटकांत 5 बाद 273 (सिद्रा अमिन नाबाद 100, आयेशा जाफर 49, मुनीबा अली 45, फातिमा सना 25, गुल फिरोजा 27, शमस 12, अल्वी नाबाद 8, अवांतर 7, अटापटू, विमुक्ती, रणवीरा आणि दिलहारी प्रत्येकी 1 बळी), लंका 46.5 षटकांत 2 बाद 275 (विश्मी गुणरत्ने 123, हर्शिता समरविक्रमा नाबाद 100, कविशा दिलहारी नाबाद 40, अटापटू 1, अवांतर 11, फातिमा सना, संधू प्रत्येकी 1 बळी).