लंकन महिला संघाचा पाकवर विजय
टी-20 मालिका, इमिशा दुलानी सामनावीर
वृत्तसंस्था, डंबुला
पाकचा महिला क्रिकेट संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आला असून उभय संघामध्ये टी-20 मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान लंकेने पाकचा सहा चेंडू बाकी ठेऊन सहा गड्यांनी दणदणीत पराभव करत विजयी सलामी दिली. 64 चेंडूत नाबाद 101 धावा झळकविणारी लंकेची इमिशा दुलानी सामनावीर ठरली.
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकांत 7 बाद 176 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 19 षटकांत 4 बाद 177 धावा जमवित आपला विजय नोंदविला.
पाकच्या डावामध्ये सलामीची फलंदाज आणि कर्णधार मुनीबा अली व शेवाल झुल्फीकार या जोडीने 39 चेंडूत 66 धावांची भागिदारी केली. मुनीबा अलीने 24 चेंडूत 9 चौकारांसह 42 धावा जमविल्या. चोरटी धाव घेण्याच्या नादात ती धावचीत झाली. मुनीबा अली तंबूत परतल्यानंतर झुल्फीकार आणि नासेर या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 51 धावांची भर घातली. इमान नासेरने 27 चेंडूत 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. लंकेच्या प्रबोधाने झुल्फीकारचा त्रिफळा उडविला. तिने 41 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 63 धावा जमविल्या. आयेशा जाफरने 2 षटकारांसह 17, फातिमा 1 चौकारासह 5, जबीनने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. पाकच्या डावात 3 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. पाकने पॉवरप्लेदरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत 64 धावा जमविल्या. झुल्फीकारने 34 चेंडूत 9 चौकारांसह अर्धशतक झळकविले. लंकेतर्फे कविशा दिलहारीने 2, प्रबोधा आणि सुगंधीकाकुमारी आणि काविंदी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेने 19 षटकांत 4 बाद 177 धावांसह आपला विजय 6 चेंडू बाकी ठेवून नोंदविला. लंकेची सलामीची जोडी इमिशा दुलानी आणि कर्णधार चमिरा अटापटू यांनी पहिल्या गड्यासाठी 43 चेंडूत 78 धावांची भागिदारी केली. अटापटूने 22 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 39 धावा जमविल्या. विश्मी गुणरत्ने केवळ 3 धावांवर तर हर्षिता समरविक्रमाने 1 चौकारांसह 7 तसेच कविशा दिलहारीने 11 तसेच निलाक्षीका सिल्वाने 1 चौकारांसह नाबाद 9 धावा जमविल्या. दुलानीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 64 चेंडूत 1 षटकार आणि 17 चौकारांसह नाबाद शतक झळकविले. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकांत 67 धावा जमविल्या. दुलानीने 63 चेंडूत 1 षटकार आणि 17 चौकारांसह शतक झळकविले. तत्पूर्वी तिने 32 चेंडूत 10 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले होते. लंकेच्या डावामध्ये तीन षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे संधूने 2 तर हनी आणि बिलाल यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक: पाक 20 षटकांत 7 बाद 176 (झुल्फीकार 63, मुनीबा अली 42, नासेर 21, आयेशा जाफर 17, जबीन 13, अवांतर 10, दिलहारी 2-36, काविंदी, सुगंधीकाकुमारी आणि प्रबोधा प्रत्येकी 1 बळी), लंका 19 षटकांत 4 बाद 177 (इमिशा दुलानी नाबाद 101, अटापटू 39, गुणरत्ने 3, समरविक्रमा 7, दिलहारी 11, निलाक्षीका सिल्वा नाबाद 9, अवांतर 7, संधू 2 बळी, बिलाल व हनी प्रत्येकी 1 बळी).