श्रीलंकेचे राष्ट्रपती करणार भारताचा दौरा
पहिल्या विदेश दौऱ्यासाठी भारताची निवड
वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके हे 15 डिसेंबर रोजी दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त भारतात येणार आहेत. राष्ट्रपती पद स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा असणार आहे. श्रीलंकेच्या कॅबिनेटचे प्रवक्sत नलिंदा जयथिसा यांनी या दौऱ्याची माहिती देत दिसानायके हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
दिसानायके यांच्यासोबत या दौऱ्यात श्रीलंकेचे विदेशमंत्री विजिथा हेराथ आणि उपवित्तमंत्री अनिल जयंता फर्नांडो देखील असतील. 15-17 डिसेंबर या कालावधीतील हा दौरा दिसानायके यांचा राष्ट्रपती म्हणून पहिलाच विदेश दौरा असेल. भारत दौऱ्याचे निमंत्रण विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी त्यांना दिले होते. दिसानायके यांच्या विजयानंतर 15 दिवसांच्या आतच जयशंकर यांनी श्रीलंकेचा दौरा केला होता. राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांचा पक्ष नॅशनल पीपल्स पॉवर 23 सप्टेंबर रोजी सत्तेवर आला होता.
दिसानायके हे एकेकाळी भारतविरोधी नेते म्हणून ओळखले जायचे. परंतु आता श्रीलंकेच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना भारताशी जुळवून घ्यावे लागणार आहे. तर दुसरीकडे दिसानायके यांनी जनतेला अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आश्वासन दिले आहे. चीननंतर भारत हाच श्रीलंकेसोबत सर्वाधिक व्यापार करणारा देश आहे. पेट्रोलियम पदार्थांसाठी श्रीलंका बऱ्याचअंशी भारतावरच निर्भर आहे. परंतु श्रीलंकेला चीनकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. दिसानायके यांच्या सरकारसाठी भारतासोबत संबंध चांगले ठेवणे आवश्यक ठरले आहे.