श्रीलंकेच्या नौदलाचा तामिळनाडूच्या मच्छिमारांवर गोळीबार
2 मच्छिमार जखमी : 13 जणांना पकडले
वृत्तसंस्था/ रामेश्वरम
श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी पहाटे खोल समुद्रात तामिळनाडूच्या मच्छिमारांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 2 मच्छिमार जखमी झाले असून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. 13 मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा ओलांडून मासेमारी करण्याप्रकरणी अटक केली आहे. हे मच्छिमार कराईकलचे रहिवासी असून नेडुंतीवुनजीक मासेमारी करत असताना हा प्रकार घडला आहे. श्रीलंकेच्या नौदलाने त्यांच्या नौकाही जप्त केल्या आहेत.
संबंधित मच्छिमार अटक टाळण्याचा प्रयत्न करत होता असा दावा श्रीलंकेच्या नौदलाने केला आहे. या मच्छिमारांना श्रीलंकेच्या कांकेसंथुराई फिशिंग हार्बर येथे नेण्यात आले आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या नौदलाने 34 मच्छिमारांना अटक करत त्यांच्या नौका जप्त केल्या होत्या. यातील 32 मच्छिमार हे तामिळनाडूचे रहिवासी होते. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मच्छिमारांच्या अटकेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. मच्छिमारांची तत्काळ मुक्तता सुनिश्चित करण्यासाठी राजनयिक पावले उचलण्यात यावीत अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली आहे.