18 वर्षानंतर लंकेचा न्यूझीलंडमध्ये विजय
वृत्तसंस्था/नेल्सन (न्यूझीलंड)
श्रीलंकेने नव्या वर्षाची सुरुवात दणदणीत विजयाने केली आहे. श्रीलंकेचा हा विजय इतका मोठा आहे की, 17 वर्षांपासून सुरू असलेला विजयाचा दुष्काळ संपला आहे. लंकेच्या या ऐतिहासिक विजयात कुसल परेराचे महत्त्वपूर्ण योगदान होते. परेराने आपल्या टी-20 कारकिर्दीतील पहिले शतक झळकावून मोठा पराक्रम केला. नेल्सन येथे खेळल्या गेलेल्या या तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेने 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. मात्र, यजमान न्यूझीलंडने 3 सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी जिंकण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, 2006 मध्ये न्यूझीलंडच्या भूमीत पहिला टी-20 सामना जिंकला होता, यानंतर मात्र त्यांना अपयश आले होते. तब्बल 18 वर्षानंतर लंकेने न्यूझीलंडला मायदेशात पराभूत करण्याची किमया केली आहे.
प्रारंभी, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमावून 218 धावांची मोठी धावसंख्या उभारली. कुसल परेराने अवघ्या 46 चेंडूंत 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 101 धावांची तुफानी खेळी केली. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूने झळकावलेले हे सर्वात जलद शतक आहे. याशिवाय, कर्णधार चारिथ असलंकाने 46 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 211 धावा करू शकला. रॉबिन्सन आणि रचिनने संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण त्यांनी विकेट गमवाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर फार काळ टिकू शकले नाहीत.
संक्षिप्त धावफलक
श्रीलंका 20 षटकांत 5 बाद 218 (कुसल परेरा 101, चरिथ असलंका 46, कुसल मेंडिस 22, मॅट हेन्री, डफी, सँटनर व मिचेल प्रत्येकी एक बळी) न्यूझीलंड 20 षटकांत 7 बाद 211 (रचिन रवींद्र 69, डॅरिल मिचेल 35, रॉबिन्सन 37, असलंका 3 तर हसरंगा 2 बळी).