लंकेचा पाकवर 8गड्यांनी दणदणीत विजय
सामनावीर मधुशनकाचे पाच बळी, कमिंदु मेंडीसचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था, लाहोर
येथे सुरू असलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील पाचव्या सामन्यात श्रीलंका संघाने यजमान पाकिस्तानचा 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. गोलंदाजीस अनकुल असलेल्या या खेळपट्टीवर लंकेने पाकला केवळ 110 धावांत गुंडाळले. त्यानंतर लंकेने 18.1 षटकांत 2 बाद 114 धावा जमवित हा सामना एकतर्फी जिंकला.
लंकेने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पण दिलशान मधुशनकाच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकचा डाव 25.3 षटकांत 110 धावांत आटोपला. बाबर आझमने 33 चेंडूत 5 चौकारांसह 29, हसन नवाजने 1 षटकारासह 17, आराफत मिनहासने 1 चौकारासह 10 तर कर्णधार शाहीन आफ्रिदीने 2 षटकारांसह 15 धावा जमविल्या. पाकच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकांत 47 धावा जमविताना 3 गडी गमविले. लंकन गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून पाकच्या फलंदाजांना चांगलेच झखडून ठेवले होते. लंकेच्या मधुशनकाने 34 धावांत 5 गडी बाद केले. आराचिगे 24 धावांत 2 तर असिता फर्नांडो, मलिंगा आणि वेलालगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेने पाकने दिलेले 111 धावांचे उद्दिष्ट 18.1 षटकांत 2 गड्यांच्या मोबदल्यात गाठले. कमिंदु मेंडीस आणि अविष्का फर्नांडो या सलामीच्या जोडीने 41 चेंडूत अर्धशतकी भागिदारी केली. शाहीन आफ्रिदीने फर्नांडोला झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. त्यानंतर पाकच्या आराफत मिनहासने कर्णधार कुशल मेंडीसचा त्रिफळा उडविला. त्याने 2 चौकारांसह 8 धावा जमविल्या.
कमिंदु मेंडीस आणि रत्नायके यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 52 धावांची भागिदारी करून विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कमिंदु मेंडीसने 60 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 62 तर रत्नायकने 26 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 23 धावा केल्या. लंकेने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 10 षटकांत 70 धावा जमविताना 2 गडी गमविले. कमिंदु मेंडीसने 42 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतक झळकविले. लंकेच्या डावामध्ये 2 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी आणि मिनहास यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : पाक 25.3 षटकांत सर्वबाद 110 (बाबर आझम 29, हसन नवाज 17, मिनहास 10, शाहीन आफ्रिदी 15, अवांतर 7, मधुशंका 5-34, आरच्चिगे 2-24, असिता फर्नांडो, मलिंगा, वेलालगे प्रत्येकी 1 बळी), श्रीलंका 18.1 षटकांत 2 बाद 114 (कमिंदु मेंडीस नाबाद 62, अविष्का फर्नांडो 16, कुशल मेंडीस 8, रत्ननायके नाबाद 23, अवांतर 5, शाहीन आफ्रिदी व मिनहास प्रत्येकी 1 बळी).