लंका-न्यूझीलंड तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द
वृत्तसंस्था/ पल्लेकेले, लंका
लंका व न्यूझीलंड यांच्यातील तिसरा व अंतिम वनडे सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आल्याने न्यूझीलंडची जाता जाता विजय मिळविण्याची संधीही हुकली. यजमान लंकेने तीन सामन्यांची ही मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली.
मायभूमीत यावर्षी जिंकलेली लंकेची ही पाचवी वनडे मालिका असून पहिल्या दोन सामन्यांत त्यांनी न्यूझीलंडवर मात केली होती. या मालिकेत प्रथमच न्यूझीलंडने चांगली सुरुवात केली होती. प्रथम फलंदाजी करताना 21 षटकांत 1 बाद 112 अशी भक्कम धावसंख्या रचली होती. पण पावसाच्या आगमनानंतर खेळ थांबवावा लागला. नंतर पुन्हा तो सुरू होऊ शकला नाही. न्यूझीलंडच्या विल यंगने अर्धशतक नोंदवताना नाबाद 56 धावा जमविल्या तर अखेरच्या सामन्यात सूर गवसल्यानंतर हेन्री निकोल्सने नाबाद 46 धावा काढल्या. दोघेही सेट झाले होते, त्यामुळे किवी संघ मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. या दोघांनी 106 चेंडूत 88 धावांची अभेद्य भागीदारी केली.
चौथ्या षटकात लंकन कर्णधार चरिथ असालंकाने मिडऑफमध्ये उंच उडी घेत सलामीवीर टिम रॉबिन्सनचा अप्रतिम झेल टिपला. त्याने 9 धावा केल्या. लंकेने या सामन्यात काही राखीव खेळाडूंना उतरवले होते. पण पावसामुळे त्यांना आजमावून पाहण्याची संधीच मिळाली नाही. त्यांनी संघात पाच बदल केले होते. अष्टपैलू चमिंदू विक्रमसिंघेने वनडे पदार्पण केले. पण त्याने दोनच षटके गोलंदाजी केली. न्यूझीलंडने आपल्या संघात झाकारी फोक्सला नाथन स्मिथच्या जागी पदार्पणाची संधी दिली तर अॅडम मिल्नेला जेकब डफीच्या जागी संधी दिली. पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेची तयारी म्हणून न्यूझीलंडला या मालिकेचा उपयोग झाला. मात्र लंका संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेला नाही.