इराकमध्ये श्रीलंकेसारखी स्थिती
संसदेत शिरले निदर्शक : इराणसमर्थक उमेदवाराला विरोध : मौलवीकडे आंदोलनाची धुरा
वृत्तसंस्था / बगदाद
शेजारी देश श्रीलंकेत राजकीय अस्थिरता आणि आर्थिक संकटामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. श्रीलंकेची जनता काही दिवसांपूर्वी सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरली होती. तसेच जनतेने राष्ट्रपती भवन तसेच पंतप्रधान निवासस्थानावर कब्जा केला होता. श्रीलंकेसारखी स्थिती आता इराकमध्ये दिसून येत आहे.
इराकमध्ये इराणसमर्थक नेत्याला पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यात आल्याच्या विरोधात बुधवारी रात्री हिंसक आंदोलन झाले आहे. हजारो निदर्शकांनी संवेदनशील क्षेत्र ओलांडून संसदेत प्रवेश केला. या निदर्शकांना रोखणे सुरक्षा दलांनाही शक्य झाले नाही. मौलवी मुक्तदा सद्र हे या निदर्शकांचे नेतृत्व करत आहेत. मौलवी सद्र हे शिया आहेत.
ग्रीन झोनमध्ये संसदेसह अनेक देशांचे दूतावास असल्याने सुरक्षा दलांना मोठी चिंता सतावू लागली आहे. तसेच या भागत सिक्रेट मिशन्सचे कार्यालय देखील आहे. निदर्शक तेथे पोहोचल्यास पोलीस आणि सैन्यासमोर गोळीबार करण्याशिवाय कुठलाच पर्याय शिल्लक नसेल आणि यात मोठय़ा प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात इराकमध्ये निवडणूक पार पडली होती. तेव्हापासून इराकमध्ये राजकीय स्थिती बिघडलेली आहे.
मोहम्मद अल सुदानी यांना आघाडी सरकारने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. सुदानी हे इराणसमर्थक मानले जातात. देशाचे मौलवी आणि त्यांचे समर्थक सुदानी यांच्या उमेदवारीला विरोध करत आहेत. बुधवारी रात्री घडलेली घटना याचे द्योतक आहे. सुदानी हे इराणच्या हातचे बाहुले असल्याचा आरोप निदर्शकांनी केला आहे. अल-सुदानी हे माजी मंत्री तसेच माजी प्रांतीय गव्हर्नर आहेत.
संसद भवनात निदर्शक गाताना तसेच नाचताना दिसून आले आहेत. एक इसम संसद अध्यक्षांच्या टेबलवर पहुडलेला कॅमेऱयात कैद झाला आहे. निदर्शक संसद भवनात शिरले तेव्हा तेथे कुठलाच खासदार उपस्थित नव्हता. परंतु सुरक्षा दल तेथे तैनात होते, तरीही त्यांनी निदर्शकांना रोखले नाही.
पंतप्रधानांचा इशारा
काळजीवाहू पंतप्रधान मुस्तफा अल कादिमी यांनी निदर्शकांना इशारा दिला आहे. निदर्शकांनी ग्रीन झोनमधून त्वरित बाहेर पडावे असे त्यांनी म्हटले आहे. ग्रीन झोनमध्ये शासकीय इमारती तसेच अनेक राजदूतांची निवासस्थाने आहेत. शासकीय संस्था आणि विदेशी दूतावासांच्या सुरक्षेला कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास निदर्शकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे कादिमी म्हणाले. पंतप्रधानांच्या इशाऱयानंतर निदर्शकांनी संसद भवनातून काढता पाय घेण्यास सुरुवात केल्याचे समजते.
राजकीय कोंडी कायम
ऑक्टोबर 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत अल-सद्र यांच्या गटाने 73 जागा जिंकल्या होत्या. 329 सदस्यीय संसदेत अल-सद्र यांचा गट सर्वात मोठा ठरला होता. परंतु नवे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया रखडली आहे. या प्रक्रियेतून अल-सद्र यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे नवे सरकार स्थापन करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत.