महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तुकारामांचा श्रीकृष्ण

06:01 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात (भ गी 10.8) अहं सर्वस्य प्रभवो मत्त: सर्वं प्रवर्तते । इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विता: अर्थात ‘मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्तीकर्ता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंत:करणपूर्वक मला भजतात.’

Advertisement

सर्वसामान्य माणसांना हा गूढ प्रŽ पडतो की श्रीकृष्ण जर देवकी आणि वासुदेवाचा पुत्र म्हणून कंसाच्या कारागृहात जन्माला आला तर तो कसा काय जगाच्या उत्पत्तीचा कारण असू शकतो? यासाठी स्वत: भगवान श्रीकृष्ण आपल्याला सावध करतात की त्यांचा जन्म आणि कर्म हे सामान्य माणसासारखे नाही तर ते दिव्य आहेत. (भ गी 4.9) जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वत:। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ।। अर्थात ‘जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही,  तर हे अर्जुन! तो माझ्या शाश्वत धर्माची प्राप्ती करतो.’

Advertisement

जसा आत्मा अजन्मा आहे तसा परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्णही अजन्मा आहे  अर्थात त्यांना भौतिक जन्म नाही म्हणून त्यांना दिव्य असे म्हटले जाते. संत तुकाराम आपल्या अनेक अभंगातून अशा श्रीकृष्णांचे दिव्यत्व व्यक्त करताना दिसतात. विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता।।1।। ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ।। ध्रु.।। निष्काम निराळा । गोपी  लावियेल्या चाळा ।। 2।। तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ।। 3।। अर्थात ‘या विश्वाचा जनक यशोदेला माता म्हणतो. तो भक्तांचा अंकित आहे, भक्ताला त्याच्या भक्तीप्रमाणे प्रेम देत असतो. परमेश्वर निष्काम असूनही गोपींना त्याचा वेध लागला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्तांसाठी तो सगुण साकार रूपामध्ये आला आहे.

आणखी एका अभंगात बाळकृष्णाच्या लीलांचे वर्णन करताना महाराज म्हणतात जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ।। 1।। मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ।। 2।। देखे भयानक झांकियेले डोळे। मागुता तो खेळे तियेपुढे ।। 3।। पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ।। 4।। मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें म्हणे देवा बाळ ।।5।।  बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ।। 6।। गळां बांधऊनि उखळासी दावें। उन्मळी त्या भावें विमळार्जुन ।। 7।। न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौळियांसी।।8।। सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी।। 9।। तरिं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ।। 10।। दुणी झालें त्याचा मानिती संतोष। दुभत्याची आस धरूनियां ।। 11।। आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें।। 12।। मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ।। 13।। लेंकरूं आमचें म्हणे दसवंती। नंदाचिये चित्ती तोचि भाव।।14।। भाव जाणावया चरित्र दाखवी । घुसळितां रवी डेरियांत ।। 15।। डेरियांत लोणी खादलें रिघोनि। पाहे तों जननी हातीं लागे ।। 16।। हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ।। 17।। सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ।।18।। यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ।। 19।। त्यांसी मायामोहजाळ घाली फांस। देर आपणास कळों नेदी ।। 20।। नेदी राहों भाव लोभिकांचे चित्ती । जाणतां चि होती अंधळीं तीं ।। 21।। अंधळीं तीं तुका म्हणे संवसारिं । जिहीं नाहीं हरी ओळखिला ।। 22।। अर्थात ‘जगाचा हा बाप श्रीकृष्णाने माती खाल्ल्याने त्याची आई यशोदा त्याला मारावयास लागली, तेव्हा मी माती नाही खाल्ली असे म्हणून त्याने तोंड पसरले, त्यामध्ये मातेला संपूर्ण ब्रह्मांड दिसले. ते भयंकर स्वरूप पाहून घाबरून तिने डोळे झाकले, तेव्हा लगेच त्याने तोंड मिटले आणि तो पूर्वीप्रमाणे खेळू लागला. त्याने आईच्या गळ्यास मिठी घातली आणि आपली माया इतरांना दिसू दिली नाही. योगमायेने शरीर धारण केलेले असल्याने यशोदा त्याला आपला बाळ समजते. रीठासुर गळ्यातील कंठा होऊन आला. कृष्णाने त्याला कंठ्याच्या रूपात गळ्यात घालता घालता आपल्या दाढेखाली धरून मारले. तसेच कागासुर व बकासुर असे मोठे दैत्य मारले. कुबेराच्या दोघा पुत्रांना नारदाने शाप दिल्यामुळे, दोन अर्जुन वृक्ष होऊन गोकुळात उभे होते, श्रीकृष्णाने यशोदेच्या हातून स्वत:ला उखळाशी बांधून घेतले आणि ते उखळ ओढत नेऊन तो त्या वृक्षामधून पलीकडे जाऊ लागला, त्यावेळी उखळ दोन्ही झाडामध्ये अडकले तेव्हा श्रीकृष्णाने जोराने उखळ ओढल्यावर दोन्ही वृक्ष कोसळले व दोन्ही कुबेरपुत्र मुक्त झाले. सर्व

ब्रह्मांडाचे जीवन असणारा असा हा अनादी कृष्ण भक्तिभावाच्या मोहिनीमुळे सुकुमार बालक वाटत होता. गौळणींच्या घरी जाऊन त्याने शिंक्मयावरील लोणी खाल्ले, तरी ते त्या मडक्मयात दुप्पट होत असे. हे दिसूनही गवळ्यांना श्रीकृष्णाचा महिमा कळला नाही. हा श्रीकृष्ण विश्वाचा जनिता आहे पण प्रेमाच्या बंधनामध्ये हे रहस्य काय त्यांना कळले नाही. नंद आणि यशोदेला प्रेमामुळे श्रीकृष्ण हा आपलाच पुत्र आहे असेच वाटे. एकवेळ आपले श्रेष्ठत्व दाखविण्यासाठी श्रीकृष्ण मोठ्या मडक्मयांमध्ये लपून बसला आणि लोणी खाऊ लागला. लोणी वर का येत नाही हे पहायला यशोदेने मडक्मयात हात घातला त्यावेळी तिच्या हाताला श्रीकृष्ण लागला. मग त्याला यशोदेने बाहेर काढले आणि त्याच्याकडे पाहून ती आश्चर्य करू लागली. यशोदेला पुत्रमोहामुळे श्रीकृष्ण समजला नाही आणि श्रीकृष्णही आपले दिव्य स्वरूप समजू देत नाहीत.

श्रीकृष्ण आपल्या भक्तांवर योगमायेचा प्रभाव टाकून त्यांना भ्रमातच ठेवतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांनी अशा रहस्यमय श्रीहरीला ओळखले नाही असे सांसारिक लोक आंधळे आहेत असे समजावे. ‘भगवंताचे भक्त भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या योगमायेमुळे ओळखत नाहीत कारण भक्तांचे प्रेमाचे आदानप्रदान स्वीकारण्यासाठी असे स्वरूप ते धारण करतात. परंतु सांसारिक लोकही भगवंतांच्या अशा दिव्य लीला समजू शकत नाहीत कारण ते भगवान श्रीकृष्णांना महामायेच्या प्रभावाने आंधळेपणाने एक सामान्य बालक समजतात. भगवान श्रीकृष्ण स्वत: हे उघड रहस्य भगवद्गीतेमध्ये  सांगतात (भ गी 7.25) नाहं प्रकाश: सर्वस्य योगमायासमावृत:। मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम् ।। अर्थात ‘मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत.’

स्वत: श्रीकृष्ण आपले भगवंत स्वरूप आपल्या प्रेमळ भक्तांचे प्रेम स्वीकारण्यासाठी लपवून ठेवतात. पण तुकारामांसारखे भक्त त्यांना ओळखल्याशिवाय रहात नाहीत.  काय आतां यासि म्हणावें लेंकरूं । जगाचा हा गुऊ मायबाप ।। 1।। माया याची यासि राहिली लपून । कळों नये क्षण एक होतां ।। 2।। क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझें माझें ऐसें करी बाळा ।। 3।। करी कवतुक कळों नेदी कोणा। योजूनि कारणा तेंचि खेळे ।। 4।। तें सुख लुटिलें घरिचिया घरिं । तुका म्हणे परी आपुल्याला ।। 5।। अर्थात ‘कृष्णाला लेकऊ तरी आता कसे म्हणावे हा तर जगाचा मायबाप व गुऊ आहे. याची माया याच्यामध्ये लपून राहते त्यामुळे हा देव आहे हे लक्षातच रहात नाही. कृष्णाच्या देवपणाचा साक्षात्कार यशोदेला झाला व तिलाही कळाले आपला कृष्ण देव आहे परंतु एक क्षण झाला की लगेच ती विसरून गेली आणि माझे बाळ, माझे बाळ असे करू लागली. कृष्ण आता काय करणार हे कोणालाही तो कळू देत नव्हता. तोच खेळाची योजना करायचा व तोच खेळ खेळायचा. तुकाराम महाराज म्हणतात, ‘गोकुळातील लोकांनी आपापल्या परीने घरीच कृष्णाचे सुख लुटले.’ यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने हरिभक्तांकडूनच दिव्य भगवंत श्रीकृष्ण समजून घ्यावा.

- वृंदावनदास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article