जोतिबाच्या ‘खेट्यांना रविवारपासून प्रारंभ!
जोतिबा डोंगर प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील अनेकांचे कुलदैवत असलेल्या दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची खेट्याची यात्रा रविवारी, 25 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. कोल्हापूरकरांची खेट्याची यात्रा म्हणून ती प्रसिद्ध आहे. खेट्यासाठी जोतिबा डोंगर परिसर सज्ज झाला आहे. यावेळी श्रीस महा अभिषेक, महापोषक, धार्मिक विधी, धार्मिक सोहळे, धुपारती व पालखी सोहळा होणार आहे. खेट्यासाठी लाखो भाविक श्रीच्या दर्शनासाठी डोंगरावर येत असतात.
माघ महिन्यात पाच रविवारी जोतिबा डोंगरावर भरणाऱ्या यात्रेस जोतिबाचे खेटे संबोधले जाते. पुर्वी केदारनाथ (श्री जोतिबा) दक्षिण मोहीम संपवून हिमालयाकडे जाण्यास निघाल्याचे करवीर निवासिनी महालक्ष्मीस समजताच ती कोल्हापूरहून अनवानी डोंगरावर आली, तिने केदारनाथांना न जाण्याविषयी विनवले तेव्हा नाथांनी वाडी रत्नागिरीवर राहण्याचे मान्य केले तेव्हापासून कोल्हापूरहून डोंगरावर पायी चालत खेटे घालण्याची प्रथा सुरु झाली, असा केदारविजय ग्रंथात खेट्याविषयी उल्लेख आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व जोतिबा पुजारी समिती यांनी जोतिबा खेट्याचे धार्मिक विधी, विविध सोहळे व भाविकांसाठी जयत तयारी सुरू केली आहे. खेट्यासाठी संपूर्ण जोतिबा नगरी सज्ज झाली आहे. शासकीय यंत्रणा भाविकांच्या सेवेसाठी नियोजन करत आहे.
दरम्यान रविवारी पहाटे चार वाजता श्री जोतिबाची पाद्यपूजा व काकड आरती करण्यात येईल, त्यानंतर श्री जोतिबा देवाबरोबर नंदी, महादेव, चोपडाई, काळभैरव, यमाई, दत्त, रामलिंग देवांना महाभिषेक घालून आकर्षक महापूजा बांधण्यात येईल त्यानंतर धार्मिक विधी, मंत्रोच्चार, महाआरती, धुपारती करून महानैवेद्य दाखवण्यात येईल. रात्री 8 वाजता पालखी सोहळ्यासाठी उंट, घोडा, वाजंत्री, देवसेवक, हुद्देवाले, कंचाळवादक, डवरी, ढोली, म्हालदार, चोपदार, श्रींचे पुजारी, देवस्थान समिती व सिंधिया ग्वाल्हेर देवस्थान समितीचे अधिकारी व कर्मचारी लव्याजम्यासह पालखी सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी निघेल. मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी सदरेवर येईल. त्यानंतर म्हालदार, ढोली, डवरींचा धार्मिक विधी, मंत्रोच्चार, ओव्या झाल्यानंतर तोफेची सलामी देऊन पालखी मंडपात येईल.
नियमांचे पालन करावे...
खेट्याच्या रविवारी काही अतिउत्साही भाविक डोंगर घाटातील गवत पेटवणे तसेच मंदिर परिसरात हुल्लडबाजी करतात, त्यामुळे वातावरण तणावपुर्ण होते अशा भाविकांनी अनुचित प्रकार न करता सहकार्य व नियमाचे पालन करावे, असे आवाहन कोडोलीचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी केले आहे.
यात्रेतील दर्शनाचा लाभ घ्यावा
दख्खनचा राजा जोतिबा देवाचे मानाचे असलेले माघ महिन्यातील पाच खेटे, उत्साहात, धार्मिक विधीसह संपन्न होण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. भाविकांनी परंपरेनुसार खेटे यात्रेचा श्रीचे दर्शनाचा लाभ घ्यावा व मंदिर परिसरातील धार्मिक विधीला व शासकीय यंत्रणाना, सहकार्य करावे, आवाहन पुजारी समितीचे अजित भिवदर्णे व आनंदा लादे यांनी केले आहे.