श्रीगणेशगीता अध्याय चौथा सारांश 2
निरपेक्षतेने कर्म करत करत अविनाशी ब्रह्मरुपाची प्राप्ती होते हे लक्षात आल्यावर कर्मयोगी तो करत असलेल्या कर्माच्या फळाचा त्याग करायला सहजी तयार होतो. त्यामुळे त्याच्या हातून कर्मसंन्यास आपोआप साधला जातो असे बाप्पांनी सांगितले.
पुढे बाप्पा म्हणाले, जे निरपेक्षतेने कर्म करत नाहीत त्यांची बुद्धी मोहाने ग्रस्त झाल्याने ते स्वत:च्या डोक्याने कर्म करत असतात आणि पापपुण्याचे धनी होतात. हे ज्यांच्या लक्षात येते ते आत्मज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. आत्मज्ञानामुळे मी म्हणजे हा देह आणि समोर दिसणारी दुनिया खरी आहे हे अज्ञान नाहीसे होऊन त्यांची बुद्धी विकसित होत असते.
आत्मज्ञान प्राप्त झाल्याने चालू आयुष्यातले भोग भोगून झाल्यावर त्यांचा उद्धार होतो. त्यांचे जे भोग भोगायची वेळ अजून आलेली नसते ते आत्मज्ञानाच्या धगीत जळून भस्म होतात. त्यामुळे त्यांचा पुनर्जन्म होत नाही. सर्वांच्या ठिकाणी समदृष्टी ठेवत असल्याने ज्याच्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते कार्य ते करत असतात. ते ब्रह्मरूप झालेले असल्याने सर्व जगत त्यांना वश असते.
जीवनात प्रारब्धानुसार कोणतीही परिस्थिती ओढवली तरी ते डगमगत नाहीत. ते कधीही मोहग्रस्त होत नसल्याने त्यांना विकार बाधत नाहीत. वरेण्य राजाने बाप्पांचे सांगणे लक्षपूर्वक ऐकले त्यावरून त्याच्या असे लक्षात आले की, पृथ्वीतलावरील जीव येनकेनप्रकारेण दु:खाच्या भोवऱ्यात अडकतो कारण तो नाशवंत गोष्टीतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्या वस्तू नष्ट झाल्या किंवा त्यातील नावीन्य संपले की, त्यांच्याकडून मिळणारे सुख ओसरते. मग त्याला असे वाटले निदान देव, गंधर्व लोकातील मंडळी तरी सुखात रहात असतील म्हणून त्याने तेथील परिस्थिती काय आहे असे बाप्पांना विचारल्यावर बाप्पा म्हणाले, जे लोक विषयसुखात रमणारे असतात त्यांना कुठेच कायम टिकणाऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. ह्याउलट जो आत्मविचारात मग्न असतो, तो कुठेही राहिला तरी त्याला अविनाशी असे सुख मिळते. कायम टिकणारे सुख मिळवण्यासाठी बाह्य गोष्टींची आवश्यकता नसते.
इच्छा आणि क्रोधावर जो नियंत्रण मिळवतो त्याला चिरंतन सुख मिळते. मात्र इच्छा व क्रोधावर एकदा नियंत्रण मिळवले की, झाले अशी परिस्थिती नसल्याने आयुष्यभर सतर्क, सावध रहावे लागते. अशाप्रकारे कामक्रोधावर विजय मिळवत, निरपेक्षतेने लोककल्याणकरी कार्ये करत पुढे जाणाऱ्या साधकाला अंतरीचा प्रकाश दिसू लागतो. सध्याच्या जीवनाचा कालावधी संपला की, त्याला परब्रम्हाची प्राप्ती होते. सद्गुरूंच्या आज्ञेत राहिल्याने हे शक्य होते.
साधकाने त्याला दीर्घकाळ ज्या आसनात बसणे शक्य आहे त्या आसनात बसून भुवयांच्यामध्ये नजर ठेवावी आणि प्राणायाम करावा. प्राण आणि अपान वायुंचा निरोध करण्याला प्राणायाम असे म्हणतात. प्राणायामचे लघु, मध्यम आणि उत्तम असे तीन प्रकार आहेत. प्राणायाममुळे मन निर्विचार होण्यास मदत होते.
प्राण आणि अपान ह्या वायुंना रोखून धरण्यात यश मिळवणे वाघसिंहांना मवाळ करण्याइतके कष्टप्रद आहे हे लक्षात ठेऊन साधकाने त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करावा. हळूहळू त्याला हे साध्य होते. हे ज्यांना साधते त्यांना शारीरिक व्याधी त्रास देत नाहीत. प्राणायाम साधल्यानंतर पूरक रेचक आणि कुंभकाचा अभ्यास करावा. असे योगसाधना करणारा साधक त्रिकालज्ञ होतो. त्याला त्रिभुवने सहज वश होतात. अशाप्रकारे कर्मयोग आणि कर्मसंन्यास हे दोन्ही सारखेच फळ देतात. जो मनापासून ह्याप्रमाणे साधना करतो त्याच्या प्रयत्नात येणारे अडथळे दूर करून मी त्याला मुक्ती प्रदान करतो.
अध्याय चौथा सारांश समाप्त.