दिल्ली कॅपिटल्सने साकारला दुसरा विजय,
आयपीएल 16: हैदराबादवर 7 धावांनी मात, अष्टपैलू कामगिरी करणारा अक्षर पटेल सामनावीर
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आयपीएलमध्ये सोमवारी झालेल्या ‘लो स्कोअरिंग’ साखळी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला केवळ 7 धावांनी हरवून रोमांचक विजय मिळविला. त्यांचा हा सात सामन्यातील दुसरा विजय आहे. 34 धावा व 21 धावांत 2 बळी मिळविणाऱ्या अष्टपैलू अक्षर पटेलला सामनावीराचा बहुमान मिळाला.
दिल्ली कॅपिटल्सला सनरायजर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 144 धावांवर रोखले होते. मनीष पांडे व अक्षर पटेल या दोघांनाच तिशी ओलांडता आली. त्यानंतर या माफक आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादला 20 षटकांत 6 बाद 137 धावांवर रोखत दिल्लीने दुसरा विजय साकार केला. अगरवाल व क्लासेन यांच्या खेळी वाया गेल्या. हैदराबादचा हा सलग तिसरा व एकंदर पाचवा पराभव आहे.
फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली नसली तरी दिल्लीच्या गोलंदाजांनी विशेषत: फिरकी गोलंदाज अक्षर पटेल व कुलदीप यादव यांनी अचूक मारा केल्यामुळे मधल्या षटकांत हैदराबादचे ठरावीक अंतराने गडी बाद झाले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पण मुकेश कुमारने अचूक टप्प्यावर मारा करीत या षटकात केवळ 5 धावा देत दिल्लीचा विजय साकार केला. या सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांपेक्षा गोलंदाजांनी सरस कामगिरी केल्याचे दिसून आले.
हैदराबादने विजयी आव्हानाचा पाठलाग करताना प्रारंभी व मधल्या षटकांत झटपट बळी गमविले असले तरी मयांक अगरवाल व हेन्रिच क्लासेन यांनी 49 व 31 धावा फटकावत आशा जिवंत ठेवल्या होत्या. गोलंदाजीत तीन बळी मिळविलेल्या वॉशिंग्टन सुंदरनेही नाबाद 24 धावा फटकावल्या. पण अखेरच्या षटकातील उद्दिष्ट मुकेशच्या अप्रतिम माऱ्यामुळे त्यालाही गाठता आले नाही आणि हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला. सुंदरने 15 चेंडूत 3 चौकार मारले तर क्लासेनने 19 चेंडूत 3 चौकार, एक षटकार, अगरवालने 39 चेंडूत 7 चौकार मारले. फटकेबाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राहुल त्रिपाठीला 15 धावा काढण्यासाठी 21 चेंडू खेळावे लागले. त्यात एकाही चौकार, षटकाराचा समावेश नव्हता. अक्षर पटेलने 21 धावांत 2, नॉर्त्जेने 33 धावांत 2, सुरुवातीला किफायतशीर मारा करणारा इशांत शर्माने 18 धावांत 1 व कुलदीप यादवने 1 बळी मिळविला.
सनरायजर्सची भेदक गोलंदाजी
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर दिल्लीच्या केवळ पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. त्यातही फक्त दोघांनाच तिशी पार करता आली. वॉशिंग्टन सुंदर व भुवनेश्वर कुमार यांचा भेदक मारा व सनरायजर्सचे चपळ क्षेत्ररक्षण यामुळे दिल्लीला 9 बाद 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. पहिल्या षटकापासूनच त्यांच्या डावाच्या गळतीला सुरुवात झाली. पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फिल सॉल्ट शून्यावर बाद झाला तर आणखी 38 धावांची भर पडल्यानंतर मिचेल मार्शही 25 धावा काढून बाद झाला. नटराजनने त्याला पायचीत केले तेव्हा त्याने 15 चेंडूत 5 चौकार मारले होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नरही फार वेळ टिकला नाही. आठव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सुंदरने त्याला बाद केले. त्याने 20 चेंडूत 21 धावा काढताना 2 चौकार, 1 षटकार मारला. याच षटकातील चौथ्या चेंडूवर सर्फराज खानही 10 धावांवर बाद झाला आणि शेवटच्या चेंडूवर अमन हकीम खानही (4) बाद झाला. यावेळी दिल्लीची स्थिती 5 बाद 62 अशी होती.
मनीष पांडे व अष्टपैलू अक्षर पटेल यांनी थोडाफार प्रतिकार करीत संघाला सव्वाशेपारची मजल मारून दिली. दोघांनी सहाव्या गड्यासाठी 59 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. 18 व्या षटकात भुवनेश्वरने ही जोडी फोडताना अक्षरला त्रिफळाचीत केले. अक्षरने 34 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 34 धावा जमविल्या. पुढच्या षटकात मनीष पांडे धावचीत झाला. त्याने 27 चेंडूत 2 चौकारांसह 34 धावा काढल्या. नंतर रिपाल पटेल, अॅन्रिच नॉर्त्जेही धावचीत झाले. कुलदीप यादव व इशांत शर्मा 4 व एक धावेवर नाबाद राहिले. हैदराबादच्या सुंदरने 28 धावांत 3 तर भुवनेश्वरने 11 धावांत 2 व नटराजनने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 9 बाद 144 : डेव्हिड वॉर्नर 20 चेंडूत 21, मार्श 15 चेंडूत 25, सर्फराज खान 9 चेंडूत 10, मनीष पांडे 27 चेंडूत 34, अमन हकीम खान 2 चेंडूत 4, अक्षर पटेल 34 चेंडूत 34, रिपाल पटेल 5, अवांतर 4. गोलंदाजी : वॉशिंग्टन सुंदर 3-28, भुवनेश्वर कुमार 2-11, टी. नटराजन 1-21, मयांक मार्कंडे 0-34.
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 6 बाद 137 : ब्रुक 7, मयांक अगरवाल 39 चेंडूत 49, त्रिपाठी 21 चेंडूत 15, क्लासेन 19 चेंडूत 31, वॉशिंग्टन सुंदर 15 चेंडूत नाबाद 24, अवांतर 1. गोलंदाजी : नॉर्त्जे 2-33, अक्षर पटेल 2-21, इशांत 1-18, कुलदीप 1-22.