सौदीत पाकिस्तानी लढाऊ विमानांची स्क्वाड्रन तैनात
कराराच्या अंतर्गत हजारो सैनिकही पाठविले : इराण युद्धादरम्यान मोठे पाऊल
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानने एका संरक्षण कराराच्या अंतर्गत सौदी अरेबियात स्वत:चे 8 हजार सैनिक, लढाऊ विमानांची एक स्क्वाड्रन आणि एक क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली तैनात केली आहे. पाकिस्तान स्वत: सद्यकाळात इराण युद्धात मध्यस्थाची भूमिका बजावत असल्याने हे पाऊल अत्यंत चकित करणारे आहे. पाकिस्तानच्या या गोपनीय अणि मोठ्या सैन्य तैनातीची बाब पहिल्यांदाच समोर आली आहे.
पाकिस्तानने सौदीत पाठविलेले सैन्य हे पूर्णपणे युद्ध लढण्यास सक्षम आहे. याचा मुख्य उद्देश सौदी अरेबियावर हल्ला झाल्यास त्याला सैन्य सहाय्य प्रदान करणे असल्याचे तीन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सौदी अरेबिया आणि पाकिस्तान दरम्यान मागील वर्षी एक संरक्षण करार झाला होता. याच्या अटी पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. या कराराच्या अंतर्गत दोन्ही देश परस्परांच्या संरक्षणासाठी प्रतिबद्ध आहेत. सौदी अरेबिया आता पाकिस्तानच्या आण्विक संरक्षणाखाली सुरक्षित असल्याचे संकेत पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी यापूर्वीच दिले होते. सूत्रांनुसार पाकिस्तानने एप्रिलच्या प्रारंभी 16 जेएफ-17 लढाऊ विमानांची पूर्ण स्क्वाड्रन सौदी अरेबियात पाठविली आहे. याचबरोबर ड्रोन्सच्या दोन स्क्वाड्रन्सची पाठविल्या आहेत.
चिनी क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली तैनात
सौदी अरेबियात पाठविण्यात आलेल्या सैन्यसामग्रीत चीनकडून निर्मित एचक्यू-9 हवाई सुरक्षा प्रणालीही सामील आहे. याचा पूर्ण खर्च सौदी अरेबिया उचलत आहे. परंतु या प्रणालीला संचालित करण्याची जबाबदारी पाकिस्तानी सैनिकांचीच असणार आहे. तैनात करण्यात आलेले 8 हजार सैनिक मुख्यकरून सल्लागार आणि प्रशिक्षणाची भूमिका बजावतील. सौदी अरेबियात पूर्वीपासून असलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या अतिरिक्त हे सैन्य असेल. गोपनीय करारानुसार गरज भासल्यास सौदी अरेबियाच्या सीमांच्या सुरक्षेसाठी 80 हजारापर्यंत पाकिस्तानी सैनिक पाठविले जाऊ शकतात. यात पाकिस्तानी युद्धनौकांच्या तैनातीचीही तरतूद आहे.
एकीकडे शांतिदूताची भूमिका
इराणने सौदी अरेबियाच्या ऊर्जा ठिकाणांना लक्ष्य केल्यावर पाकिस्तानने ही लढाऊ विमाने पाठविली होती. तर त्यानंतरच पाकिस्तान इराण युद्धात मुख्य मध्यस्थ म्हणून समोर आला होता. पाकिस्तानने अमेरिका आणि इराणदरम्यान युद्धविरामात भूमिका पार पाडली आहे. तर दुसरीकडे सौदी अरेबियात स्वत:चे सैन्य पाठवून पाकिस्तानने इराणला वाटणारा संशय खरा ठरविला आहे.