एस अँड पीचा जीडीपीचा अंदाज 6.8 टक्के कायम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षाकरीता भारताचा जीडीपी दर हा 6.8 टक्के इतकाच असणार असल्याचा अंदाज जागतिक स्तरावरील रेटिंग्ज एजन्सी एस अँड पी यांनी वर्तवला आहे. चढलेले व्याजदर आणि महसुलात प्रोत्साहनाचा अभाव याकारणास्तव कंपनीने वरील अंदाज मांडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने आपल्या आर्थिक वृद्धीत कमालीची क्षमता कायम राखत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 8.2 टक्के इतका जीडीपी दर राखला आहे. एजन्सीच्या मते चालू आर्थिक वर्षात विकास दर 6.8 टक्के इतका राहू शकतो. याचसोबत आर्थिक वर्ष 2025-26 चा आणि 2026-27 चा जीडीपी दर हा अनुक्रमे 6.9 टक्के, 7 टक्के इतका राहू शकतो, असेही अंदाज एजन्सी वर्तवले आहेत.
इतरांचा अंदाज
आर्थिक वर्षाकरीता विकास दराबाबत रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा एजन्सीचा अंदाज हा तुलनेने कमी आहे. रिझर्व्हने विकास दर 7.2 टक्के राहणार असल्याचा अंदाज मांडला आहे. याचप्रमाणे फिच रेटिंग एजन्सीने 2024-25 मध्ये विकास दर 6.6 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे.