रायण्णांचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा!
सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी यांच्याकडून नंदगड येथील संगोळ्dळी रायण्णा समाधीस्थळाच्या विकासकामांची पाहणी : 261 कोटीचा निधी मंजूर
वार्ताहर/नंदगड
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले. त्यामध्ये क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे योगदान महत्त्वाचे आहे. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांनी आपल्यापरीने स्वातंत्र्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रायण्णा यांचे बलिदानही झाले. अशा थोर स्वातंत्र्य सैनिकाचा इतिहास व त्यांनी देशासाठी केलेले कार्य आजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे हाच आपला उद्देश असल्याचे प्रतिपादन कर्नाटक राज्याचे सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी त्यांनी व्यक्त केले. मंगळवारी सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी यांनी नंदगड येथील क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या फाशीस्थळी व समाधीस्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य व्यक्त केले.
यावेळी त्यांच्यासमवेत राज्याचे माजी मंत्री व गॅरंटी अनुष्ठान प्राधिकारांचे अध्यक्ष एच. एम. रेवण्णा, आमदार विठ्ठल हलगेकर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी, महांतेश राऊत, शंकर सोनोळी, नंदगड ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, सदस्य मन्सूर ताशीलदार, संदीप पारिश्वाडकर, प्रशांत लक्केबैलकर, सुरेश देगांवकर, राजेंद्र लक्केबैलकर, वैष्णवी पाटली, दीपा पाटील, प्रवीण पाटील आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक मंत्री शिवराज तंगडगी यांनी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या समाधीस्थळी नव्याने उभारण्यात येत असलेल्या शौर्यभूमीची पाहणी केली. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या इतिहासामध्ये काही त्रुटी आहेत. किंवा काही कामात कमतरता आहे. याबद्दल संबंधित कंत्राटदाराला व अधिकाऱ्यांना सूचना केली. कोणत्याही परिस्थितीत 9 डिसेंबर 2024 पूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, अशी सूचना दिली.
अधिवेशनापूर्वी काम पूर्ण करण्याची सूचना
बेळगाव येथे डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह विविध खात्यांचे मंत्री उद्घाटन कार्यक्रमाला नंदगड येथे उपस्थित राहणार आहेत. त्यावेळी या ठिकाणी कोणतीही कमतरता भासू नये, अशी सक्त ताकीद विकासकामांच्या ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना मंत्र्यांनी दिली. मंत्री शिवराज तंगडगी यांनी संगोळ्ळी रायण्णांचे जन्मस्थळ संगोळ्ळी व समाधीस्थळ नंदगड येथील विकासासाठी राज्य सरकारने 261 कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच हे काम हे पूर्णत्वाकडे नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नंदगड गावातील अनेकांनी काही समस्या उपस्थित मंत्र्यांना व आमदारांना सांगितल्या. लवकरच त्या समस्यांचे निवारण करण्यात येणार असल्याचे आश्वासन सांस्कृतिक मंत्री तंगडगी यांनी दिले.खानापूर-यल्लापूर राज्यमार्गापासून क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या फाशीस्थळापर्यंतचा रस्ता नादुरुस्त झाला आहे. यासाठी निधी मंजूर झाला आहे. परंतु हा रस्ता करण्यात आला नाही. याबाबतची समस्या स्थानिकांनी उचलून धरली. लागलीच सांस्कृतिक मंत्री तंगडगी यांनी लोकोपयोगी खात्याच्या अधिकाऱ्यांना आगामी आठवड्याभरात या रस्त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा क्रम घेण्यात येणार असल्याचा सज्जड इशारा दिला. यावेळी नंदगडसह परिसरातील अनेक लोक उपस्थित होते.