स्पोर्ट्सवेअर कंपनी अॅडिदास करणार कर्मचारी कपात
भारतातल्या कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ : टेक हब विभागात कपात
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जर्मनीतील क्रीडा साहित्य अर्थात स्पोर्ट्सवेअर उत्पादन घेणारी अॅडिदास ही गुरुग्राम स्थित कंपनी येत्या काळात आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. ही कपात 350 जणांची असणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर, डाटा सायंटीस्ट व डाटा इंजिनियर्स यांचा समावेश असणार आहे, असे सांगितले जात आहे.
अर्थात ही कपात कंपनीच्या टेकहब विभागात होणार आहे. सदरच्या विभागामध्ये जवळपास 700 कर्मचारी काम करतात. अॅडीदासने भारतामध्ये आपल्या तंत्रज्ञान संघटनांमधील अनेक कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याची माहिती दिली आहे. कंपनीने हा निर्णय कंपनीसाठी कठीण असल्याचे म्हटले आहे.
का घेतला निर्णय
व्यवसायाच्या बदलत्या गरजांनुरुप आवश्यक ते उपाय कंपनीतर्फे केले जात आहेत. या कपातीसोबतच कंपनीची संघटना काही बाबतीत अधिक सरळ बनविणे, महत्त्वपूर्ण क्षमतांना अधिक बळ देणे आणि स्पर्धात्मक वातावरणात यशस्वीतेसाठी योग्य तो मार्ग रचणे यासारख्या कठीण गोष्टी येत्या काळात कंपनीला कराव्या लागणार आहेत. या निर्णयाचा परिणाम भारतातील कंपनीच्या कर्मचाऱ्यांवरही होणार आहे. काही तंत्रज्ञान संघटनांमधील 20 टक्क्यांपेक्षा कमी कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे.