स्पोर्ट्स mania
‘स्मार्ट अॅसेसिन’...रो‘हिट’ शर्मा !
आपल्या 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या शेवटी रोहित शर्मासमोर चालून आलीय ती ‘टी-20 विश्वचषक’ जिंकून कर्णधार या नात्यानं ‘आयसीसी किताब’ पटकावण्याच्या बाबतीत सलणारी उणीव दूर करण्याची नामी संधी...एक फलंदाज म्हणून रोहितकडे न्यूयॉर्कमधील वेगवान, पण मिळेल तसा चेंडू उसळणाऱ्या खेळपट्ट्यांशी अन् स्पर्धेच्या उत्तरार्धात कॅरिबियनमधील संथ खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्याचं कौशल्य निश्चितच दडलंय...
जर हार्दिक पंड्याला गेल्या वर्षी दुखापत झाली नसती अन् त्याची ‘आयपीएल’मधील वाटचालही निराशाजनक राहिली नसती, तर ?...रोहित शर्माची कदाचित ‘टी-20’ संघात फलंदाज म्हणून वर्णी लागली असती, पण विश्व़चषकात संघाचं नेतृत्व त्याच्याकडे चालून आलं असतं का ?...त्यादृष्टीनं पाहता रोहितचं नशीब जोरावर आहे असंच म्हणावं लागेल. मात्र तो मिळालेल्या संधीचा फायदा घेत आपलं राहिलेलं एकमेव स्वप्न पूर्ण करू शकेल का ?...
शिखर गाठून, विश्वचषक उचलून पूर्ण समाधानानिशी निरोप घेण्याची ही रोहित शर्माला असलेली शेवटची संधी...गेल्या ऑक्टोबरमध्ये पुण्यात झालेल्या विश्वचषकातील बांगलादेशविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पंड्याला झालेल्या दुखापतीची तीव्रता आणि त्यातून सावरण्याची दीर्घ प्रक्रिया यामुळं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कर्णधारपदाच्या बाबतीत वेगळा पर्याय चोखाळावा लागला...खरं तर 2022 च्या विश्वचषकात इंग्लंडविऊद्ध उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रोहित टी-20 मधील भारताच्या समीकरणांत कुठंच नव्हता. त्यानंतर या प्रकारात तो पुन्हा झळकला अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून. पंड्याच्या तंदुऊस्तीविषयी असलेल्या चिंतेबरोबरच गेल्या वर्षीच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील धडाक्यानं या 37 वर्षीय खेळाडूला पुन्हा एकदा टी-20 संघात जागाच मिळवून दिली नाही, तर थेट कर्णधारपदी नेऊन बसविल अन् जगज्जेतेपदाचं लक्ष्य भेदण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याची संधीही दिली...
खरं तर 2022 च्या ‘विश्वचषका’तच रोहित शर्मानं आपली आंतरराष्ट्रीय ‘टी-20’ कारकीर्द संपविली असती, तरी त्याबद्दल पश्चाताप व्हावा अशी त्याची परिस्थिती नव्हती. कारण त्यानं तोवर या प्रकारात जवळपास सर्व काही साध्य केलं होतं असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये...रोहित आधीच विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलाय...यंदाच्या विश्वचषकापूर्वीची स्थिती विचारात घेता त्यानं 151 सामन्यांतून 3,974 धावा फटकावल्या होत्या अन् ‘टी-20’तील सर्वांत जास्त धावा काढलेल्या फलंदाजांमध्ये तो होता तिसऱ्या स्थानावर...ग्लेन मॅक्सवेलसह सर्वांत जास्त पाच शतकं आहेत ती त्याच्याच नावावर...भारताचा कर्णधार म्हणून त्याच्या खात्यात विसावले होते महेंद्रसिंह धोनीइतकेच विजय. खेरीज पाच ‘आयपीएल’ विजेतेपदांना विसरून कसं चालेल ?..
कसर राहिलीय ती एकच...कर्णधार म्हणून ‘आयसीसी’ स्पर्धेचा किताब जिंकता न येणं, विश्वचषकावर आपली मोहर उमटविता न येणं...गेल्या दशकभरात भारतीय संघाला हुकलेली ही एकमेव गोष्ट. याबाबतीत आपण यशाची चव शेवटची चाखली होती ती 2013 च्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’त...रोहित गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात ते ध्येय पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण अहमदाबाद इथं झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं अन् खास करून ट्रेव्हिस हेडनं त्याच्या स्वप्नाचा चुराडा केला. संपूर्ण स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविल्यानंतर बसलेला तो धक्का जबरदस्त होता. ते घाव या ‘टी-20 विश्वचषका’तून भरून काढता येतील...
रोहितनं आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुऊवात केली ती यजमान दक्षिण आफ्रिकेविऊद्ध 40 चेंडूत नाबाद 50 धावांचा डाव खेळून. त्या विश्वचषक स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये तो नाबाद राहिला होता...तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधार म्हणून विराट कोहलीची जागा त्यानं 2021 च्या अखेरीस घेतली ती ‘मुंबई इंडियन्स’चं नेतृत्व करताना बजावलेल्या पराक्रमाच्या जोरावर...‘बीसीसीआय’चे वरिष्ठ पदाधिकारी अजूनही त्याला भारताला विश्वविजेते बनवण्याच्या दृष्टीनं हुकमी एक्का मानतात ते उगाच नव्हे...
समोर आलेल्या अडथळ्यांमधून शिकणं आणि ती शिदोरी घेऊन पुन्हा नव्यानं उपाय शोधण्याचा प्रयत्न करणं हे बलस्थान असलेल्या रोहित शर्माची अमेरिकत आणि कॅरिबियन बेटांमध्ये फलंदाज म्हणूनच नव्हे, तर कर्णधार म्हणूनही प्रतिष्ठा पणाला लागेल...त्याच्यासाठी मागील टी-20 विश्वचषक हा अनेक धडे देणारा राहिलाय. त्यावेळी ऑस्ट्रेलियात भारत अंतिम चार संघांमध्ये पोहोचलेला असला, तरी ते कधीही विजेते बनू शकणाऱ्या संघासारखे दिसले नाहीत. याउलट मागील वर्षी झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात भारतानं सुरुवातीपासून सनसनाटी कामगिरींची मालिका लावली अन् पराभूत करण्यास कठीण अशी आपली प्रतिमा बनवली...सध्याच्या विश्वचषकात खेळताना रोहितनं आपल्या ‘टी-20’ संघात हेच परिवर्तन आणण्याचं, तसाच आक्रमक धडाका लावण्याचं लक्ष्य बाळगलेलं असल्यास नवल नव्हे...
या विश्वचषकात प्रभाव पाडू शकणाऱ्या ज्या फलंदाजांविषयी चर्चा चाललीय त्यात रोहित शर्माचं नाव खरं तर ठळकपणे झळकलेलं नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे ‘आयपीएल’मध्ये दिसून आलेला सातत्याचा अभाव. 2018 नंतर प्रथमच त्यानं 400 धावांचा टप्पा ओलांडला. असं असलं, तरी प्रभावशाली खेळी त्याला करता आल्या नाहीत. त्यानं ‘चेन्नई सुपर किंग्स’विरुद्ध शतक फटकावलं अन् शेवटच्या सामन्यात चमकदार 68 धावा केल्या खऱ्या, परंतु तब्बल सात सामन्यांमध्ये त्याचा डाव कमी धावसंख्येवर संपुष्टात आला...
या पार्श्वभूमीवर आपल्या फलंदाजीनं प्रतिस्पर्ध्यावर आरंभीलाच दबाव आणण्याच्या, संघाला मोलाची ऊर्जा मिळवून देण्याच्या रोहित शर्माच्या क्षमतेचा कस लागेल. ते कौशल्य गेल्या वर्षी विश्वचषकात दिसलं. तिथं त्याच्या झपाट्यामुळं भारताला जबरदस्त वेगानं मोठ्या धावसंख्या उभारता आल्या. मात्र 37 व्या वर्षी अतिताण टाकणाऱ्या या छोट्या प्रकारात तो त्याची पुनरावृत्ती करून दाखवू शकेल का असा प्रश्ऩ उठविण्यात येत असला, तरी त्याला किमान आयर्लंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार अर्धशतक फटकावून रोहितनं चपखल उत्तर दिलंय !
सर्वांत यशस्वी कर्णधार...
- आयर्लंडविऊद्धच्या ‘टी-20’ विश्वचषकातील भारताच्या पहिल्या सामन्यात रोहित शर्मानं केवळ फलंदाजीतील अनेक विक्रम मोडले नाहीत, तर कर्णधार या नात्यनं महान एम. एस. धोनीलाही मागं टाकलं अन् क्रिकेटच्या या सर्वात लहान ‘फॉर्मेट’मधील सर्वांत यशस्वी भारतीय ‘कॅप्टन’ ठरण्याचा मान मिळविला...रोहितच्या खात्यात आहेत ते 55 लढतींतून 42 विजय, तर धोनीनं नोंदविले होते 72 सामन्यांतून 41 विजय...
- मैदानावरील रोहितचं शांत आणि संयमी वर्तन हे त्याच्या कर्णधार म्हणून कारकिर्दीचं एक मोठं वैशिष्ट्या राहिलंय. सामन्यातील परिस्थिती कुठल्या दिशेनं चाललीय ते हेरण्याची आणि त्यानुसार रणनीती आखण्याची त्याची क्षमता हा त्याच्या नेतृत्वाखालील भारताच्या यशात महत्त्वाचा घटक राहिलाय...
- शिवाय रोहितच्या खेळाडूंना हाताळण्याच्या कौशल्याची नेहमीच प्रशंसा झालीय. त्यानं संघामध्ये विश्वासाचं, सौहार्दाचं वातावरण राहील याची काळजी घेतलीय. आपल्या खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याच्या अन् त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागविण्याच्या त्याच्या क्षमतेचा संघातील खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीत मोलाचा वाटा राहिलाय...
अनेक विक्रम मोडूनच शुभारंभ...
- आयर्लंडच्या सामन्यादरम्यान तीन षटकार लगावत रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज बनून इतिहास घडविला...त्याच्या मागोमाग आहे तो ख्रिस गेल (553 षटकार) अन् शाहिद आफ्रिदी (476 षटकार)...
- याशिवाय रोहित ‘टी-20’मध्ये 4000 धावांचा टप्पा ओलांडणारा विराट कोहली (4038) व बाबर आझम (4023) यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज ठरला...
- नवव्या षटकात त्यानं ‘टी-20 विश्वचषका’तील 1000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणाराही तो कोहली आणि श्रीलंकेचा महेला जयवर्धने यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज...
रोहित शर्माची ‘टी-20’ कारकीर्द...
- प्रकार सामने डाव नाबाद धावा सर्वोत्कृष्ट सरासरी शतकं अर्धशतकं
- टी-20 152 144 16 4026 121 31.45 5 30
- आयपीएल 257 252 29 6628 109 29.72 2 43
खेळ जुनाच ओळख नवी : स्पोर्ट क्लाइंबिंग
स्पोर्ट क्लाइंबिंग...एक असा आधुनिक खेळ जो गेल्या 20 वर्षांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालाय. हा खास करून तऊणांचा आणि महिला व पुरुष या दोघांचाही सहभाग राहणारा खेळ...यातील 39 टक्के ‘क्लाइंबर्स’ हे 18 वर्षांखालील असून ‘आऊटडोअर’ आणि अधिक शहरी स्वरूपात ‘इनडोअर’ अशा दोन्ही ठिकाणी त्याचे आयोजन होते. जगभरातील 150 देशांमधील ‘क्लाइंबर्स’ची संख्या सुमारे अडीच कोटींहून जास्त भरते...
- 1985 मध्ये ‘स्पोर्टरोकिया’ नावाच्या उपक्रमासाठी इटलीतील ट्युरिनजवळील बारडोनेचिया येथे ‘क्लाइंबर्स’चा एक गट जमला. ही आयोजित करण्यात आलेली या खेळाची पहिली ‘लीड’ प्रकारातील स्पर्धा बनली. ‘लीड’मध्ये स्पर्धक ठरावीक वेळेत चढाई करतात. एक वर्षानंतर ल्योन, फ्रान्सजवळील व्हॉल्क्स-एन-वेलिन इथं कृत्रिम भिंतीवरील पहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली...
- ऑलिम्पिकमध्ये ‘स्पोर्ट क्लाइंबिंग’ या खेळात तीन प्रकारांचा समावेश होतो...‘बोल्डरिंग’, ‘स्पीड’ नि ‘लीड’...यापैकी ‘बोल्डरिंग’मध्ये खेळाडू दोरीशिवाय 4.5 मीटर उंच भिंतींवर मर्यादित कालावधीत आणि शक्य तितक्या कमी प्रयत्नांमध्ये चढतो...
- ‘स्पीड’ हा अचूकतेवर भर देणारा प्रकार असून त्यात एकामागोमाग एक ‘एलिमिनेशन राऊंड’ घेतले जातात आणि दोन स्पर्धकांमध्ये स्पर्धा रंगते. घड्याळाच्या काट्यांशी स्पर्धा करणारी ही एक नेत्रदीपक स्पर्धा...15 मीटर उंच आणि पाच अंशांत कललेली भिंत चढण्यासाठी पुऊष गटात नोंदविण्यात आलेली सर्वोत्कृष्ट वेळ ही सहा सेकंदांची, तर महिला गटात सात सेकंदांची...
- ‘लीड’ प्रकारात खेळाडू सहा मिनिटांत 15 मीटर उंच भिंतीवर शक्य तितक्या उंच चढतात. हा मार्ग अधिकाधिक जटील नि आव्हानात्मक असतो आणि त्यात सर्व खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लागतो...
- ‘स्पीड’मधील भिंत सर्व स्पर्धांमध्ये सारखीच असते. प्रत्येक ‘होल्ड’ समान आकाराचा असतो आणि प्रत्येक वेळी भिंतीवर त्याच ठिकाणी ठेवला जातो. ‘बोल्डरिंग’ व ‘लीड क्लाइंबिंग’मध्ये त्याच्या अगदी उलटं घडतं. तिथं प्रत्येक मार्ग वेगळा असतो आणि स्पर्धा सुरू होईपर्यंत खेळाडूंना त्या मार्गांबद्दल कोणतीही माहिती दिली जात नाही...
- स्पर्धेच्या वेळी दोन समांतर ‘स्पीड’ भिंती ‘लेन ए’ आणि ‘लेन बी’ एकमेकांच्या बाजूला ठेवल्या जातात. दोन अॅथलीट ही भिंत चढतात. ‘बझर’च्या आवाजानिशी प्रारंभ होतो. प्रत्येक लेनच्या शीर्षस्थानी एक ‘टचपॅड’ असतं, ज्याला प्रत्येक ‘क्लाइंबर’नं घड्याळ थांबविण्यासाठी हात लावायचा असतो...
- टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळाडूनं तिन्ही प्रकारांत भाग घेतला आणि तीन स्पर्धांचे निकाल एकत्रित करून अंतिम गुण ठरविण्यात आले. सर्वांत कमी ‘स्कोअर’ असलेल्या ‘क्लाइंबर’नं ‘स्पोर्ट क्लाइंबिंग’ खेळाच्या इतिहासातील पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलं...
- यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र ‘स्पोर्ट क्लाइंबिंग’च्या दोन स्पर्धा होतील अन् त्यातून दोन ऑलिम्पिक जेते ठरविले जातील. यापैकी एक स्पर्धा ‘बोल्डरिंग’ची, तर दुसरी ‘स्पीड’ व ‘लीड’ यांची एकत्रित स्पर्धा असेल...
- राजू प्रभू
दमलेले बॅडमिंटनपटू
दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन यंदा तरी जिंकणार का, असा प्रश्न अलीकडे बॅडमिंटन चाहते विचारत आहेत. अलीकडील काळातील या सर्वांची कामगिरी पाहता, हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक आहे. आता सिंधू-श्रीकांत खेळत असलेल्या बहुतेक स्पर्धांचा दर्जा कमालीचा उच्च असतो. त्यात सातत्याने कोणालाच यश मिळतेच असे नाही, तरीही या दोघींकडून प्रत्येक स्पर्धेत भारताला जेतेपद हवे असते. अलीकडील काळात जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडू दमत आहेत आणि त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर होत असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे. 2022 मध्ये तिने सिंगापूर ओपनमध्ये जेतेपद पटकावले होते, यानंतर दोन वर्षात तिला एकही जेतेपद मिळवता आलेले नाही. हीच बाब पुरुष बॅडमिंटनपटूच्या बाबतीत आहे. पॅरिस ऑलिम्पिक जवळ आलेली असताना भारताच्या या स्टार बॅडमिंटनपटूंचे अपयश नक्कीच चिंतेत टाकणारे आहे.
अतिबॅडमिंटनमुळे खेळाडू थकले आहेत, बॅडमिंटन कोर्टवर त्यांची दमछाक होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दोन वर्षापूर्वी सिंधूने सिंगापूर ओपन स्पर्धा जिंकली होती. यानंतर आतापर्यंत तिला एकही जेतेपद पटकावता आलेले नाही. जागतिक मानांकनातही तिची बाराव्या स्थानी घसरण झाली आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत तिने चीन, कोरिया, डेन्मार्क, फ्रान्स, हाँगकाँग, इंडोनेशिया, मलेशिया मास्टर्स स्पर्धेत ती सहभागी झाली. या दरम्यान कमी विश्रांती, सरावासाठी पुरेसा वेळ न मिळणे, प्रवासाची दगदग. या साऱ्या बाबी म्हणजे एक चक्रव्यूहच. ते भेदणे केवळ सिंधूलाच नव्हे तर जगातील प्रमुख बॅडमिंटनपटूंना कठीण ठरत आहे.
सायना, सिंधू भारतीय बॅडमिंटनसाठी महत्वाच्या आहेत, पण या दोघी म्हणजे भारतीय बॅडमिंटन नव्हे. अलीकडील काळात किदाम्बी श्रीकांत, बीसाई प्रणित, पाऊपल्ली कश्यप, समीर वर्मा, लक्ष्य सेन, प्रणॉय, प्रियांशू राजावत तर महिलांत गायत्री गोपीचंद, त्रिसा जॉली, आकर्षी कश्यप, अश्मिता चहल, मालविका बनसोड या युवा भारतीय खेळाडूंनी आपला ठसा उमटवला आहे. पण, या युवा खेळाडूंत सातत्य नसल्याचे दिसून येत आहे. चिनी, कोरियन, जापनीज खेळाडूंसमोर भारतीय खेळाडू एखादा-दुसरा विजय मिळवतात. पण, पुढील स्पर्धेत पुन्हा अपयशी ठरतात, ही बाब नक्कीच वेदनादायी आहे. या साऱ्या अपयशातून प्रेरणा घेत बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी करण्यावर भर द्यायला हवा.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांची आशा
बॅडमिंटन हा भारतासाठी पदकविजेता खेळ आहे. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले. यात प्रगती साधत 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूने रौप्य पटकावले. आता अवघ्या महिनाभरात पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे. सिंधूकडे ऑलिम्पिकचा पुरेसा अनुभव आहे. युवा लक्ष्य सेन, श्रीकांत, प्रणॉय यांना पुरुष एकेरीत जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे. महिला दुहेरी, मिश्र दुहेरीत भारतीय खेळाडूंना विजयासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अर्थात, बॅडमिंटनमधील चिनी, कोरियन, जापनीज, इंडोनिशयन खेळाडूंचे वर्चस्व पाहता या युवा खेळाडूंचा चांगलाच कस लागणार आहे. याचवेळी सातत्याने जागतिक पातळीवर खेळल्यामुळे दमलेले खेळाडू अपेक्षापूर्ती करतील का? हा लाखमोलाचा प्रश्न असणार आहे.
सात्विक-चिरागकडून अपेक्षा
सात्विकसाईराज रंकीरे•ाr व चिराग शेट्टी ही जोडी 2015 मध्ये जमली. खरं तर दोघांचाही खेळ आक्रमक आणि दोघेही कोर्टवर मागे म्हणजे खोलवर राहून खेळणारे. त्यामुळे ही जोडी पुरुष दुहेरीत कितपत यशस्वी होईल याबद्दल शंकाच होती पण मलेशियन प्रशिक्षक टॅन किम यांनी त्यांना एकत्र आणले. त्यांच्या खेळात बदल केला. त्यांनीसुद्धा तो स्वीकारला, मैदानाबाहेर मैत्रीसुद्धा घट्ट केली आणि आज त्यांचे यश आपण बघतोय. सात्विकसाईराज रंकीरे•ाr व चिराग शेट्टी या जोडीने एकत्र खेळताना मागील दोन वर्षात धमाल उडवून दिली आहे. राष्ट्रकुल सामन्यांचे सुवर्णपदक आणि वर्ल्ड चॅम्पिशनशीपचेही कास्यपदक त्यांच्या नावावर आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, थॉमस कप व यंदाच्या वर्षातील आशिया चषकातील विजयातही त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ही जोडी भारताला पुरुष दुहेरीतील पहिलेवाहिले सुवर्ण जिंकून देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
विनायक भोसले /कोल्हापूर